अबब...! कोरोना नियम मोडल्यास तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड, 'या' देशाने दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:03 PM2021-08-03T13:03:04+5:302021-08-03T13:05:28+5:30
Saudi Arabia Corona: सौदीने प्रवासासंबंधी लावलेले नियम मोडल्यास दंडात्कम कारवाई केली जाईल.
रियाद: अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरब (Saudi Arabia) सरकार कोरोना नियमांबाबत अतिशय कठोर झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासावर लावलेल्या नियमांना अजून कठोर करत दंडाची रक्कमही वाढवली आहे. यापूर्वी सरकारने नियमांचे पालन न केल्यास 3 वर्षांचा ट्रॅव्हल बॅन लावण्याची घोषणा केली होती.
‘अरब न्यूज’च्या रिपोर्टनुसार, सौदी सार्वजनिक अभियोजन कार्यालय (Saudi Public Prosecution Office) ने प्रवासासंबंधी दिलेले नियम मोडल्यास मोठा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दंडाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सरकारी आदेशानुसार, कोरोनाची दुसरी लाट आलेल्या देशांचा प्रवास केल्यावर संबंधित व्यक्तीला 133,323 डॉलर म्हणजेच तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल.
रेड लिस्टमध्ये भारताचे नाव
दरम्यान, सौदी अरबने यापूर्वीच रेड लिस्टमध्ये सामील देशांचा प्रवास केल्यावर तीन वर्षांचा ट्रॅव्हल बॅन लावण्याचा आदेश जारी केला होता, तर आता दंडाची रक्कमही वाढवली आहे. सौदी अरबने आपल्या रेड लिस्टमध्ये भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमीरात इत्यादी देशांना ठेवले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या देशांना रेड लिस्टमधून काढण्यात येईल, असेही सौदी सरकारने स्पष्ट केले आहे.