फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश; तिथल्या जनतेच्या आनंदाचं गुपीत काय?; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:41 AM2022-03-20T07:41:12+5:302022-03-20T07:42:42+5:30
१४६ देशांच्या यादीत भारत १३६व्या क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क : कोणता देश सगळ्यात आनंदी आणि कोणत्या देशात दु:ख सर्वाधिक याचा एक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. जगभरातील १४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात युरोपातील फिनलंड हा देश सर्वात आनंदी असल्याचे निदर्शानास आले आहे. भारत मात्र १४६ देशांच्या यादीत १३६व्या क्रमांकावर आहे.
सगळ्यात पहिला मुद्दा होता आरोग्याचा. संबंधित देशातील किती नागरिक निरोगी आहेत याची सरासरी काढण्यात आली. तुमच्याकडे संपत्ती किती? त्यावरूनही आनंदीपणाची पातळी ठरविली. त्यानंतर जीवनशैली, जीवनमान, सामाजिक स्थिती, अभिव्यक्तिस्वातंत्र्य इत्यादींचीही मोजमाप करण्यात आली.
आनंदाची कारणे
फिनलंडमध्ये नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
येथील हवामान आल्हाददायक असून निरोगी लोकांची संख्या अधिक आहे.
लोकांची जीवनशैली व जीवनमान आनंददायी आहे.
या सर्व कारणांमुळे फिनलंडचे नागरिक सर्वात आनंदी आहेत.
भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव गेले. त्यातच अनेकांच्या रोजगारांवर गदाही आली.
कोरोना महासाथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गाडे घसरले. त्यामुळे अतिरिक्त साडेसात कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले. या सर्व गोष्टींमुळे देशाच्या आरोग्यावर परिणाम झाला. म्हणून आनंदी देशांच्या यादीत भारत तळाला गेला.