Fire in New York: न्यूयॉर्कमधील बहुमजली इमारतीत भीषण आग, 9 मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:00 AM2022-01-10T11:00:33+5:302022-01-10T11:01:14+5:30
Fire in New York: यापूर्वी 1990 मध्ये न्यू यॉर्कमधील हॅप्पी लँड सोशल क्लबला अशाच प्रकारची भीषण आग लागली होती. त्या आगीत 87 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
वॉशिंग्टन: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात इमारतीला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. यात 50 हून अधिक लोक जखमीही झाले आहेत. जखमींना पाच वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमींपैकी डझनभरांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर राहणाऱ्या लोकांना आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. अग्निशमन विभागाचे आयुक्त डॅनियल निग्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या 200 बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीचे कारण अस्पष्ट
आग कशी लागली याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण, न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या म्हणण्यानुसार ही आग रुम हिटरमुळे लागल्याचा अंदाज लावला जात आहे. महापौरांनी हा अपघात शहरातील सर्वात भीषण अपघात असल्याचे म्हटले आहे.
असे अपघात यापूर्वी घडले आहेत
अग्निशमन विभागाचे आयुक्त डॅनियल नेग्रो यांनी आगीच्या तीव्रतेची तुलना हॅप्पी लँड सोशल क्लबच्या आगीशी केली, ज्यात 87 लोकांचा मृत्यू झाला होता. बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या त्या क्लबमध्ये स्प्रिंकलर नव्हते. 1990 साली झालेल्या त्या अपघातात एका व्यक्तीने आपल्या माजी मैत्रिणीशी वाद घालून क्लबमधून हाकलून दिल्याने जाणीवपूर्वक इमारतीला आग लावली होती. शहराच्या इतिहासातील आणखी एक आगीची घटना 1911 मध्ये घडली ज्यामध्ये 146 लोकांचा मृत्यू झाला.