ऑस्ट्रेलियातील आगीत २३ बळी, संकटाला तोंड देण्यासाठी ३ हजार सैनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:07 AM2020-01-05T06:07:19+5:302020-01-05T06:07:27+5:30
ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत २३ जणांचा बळी घेतला आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत २३ जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी ३ हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात १४ हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या १ लाख लोकांपैकी ७० टक्के लोक येथून निघून गेले आहेत.
माऊंट होथममध्ये ६७ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग ८० कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८२ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झाले आहे.
>आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा
भारत दौरा रद्द
आॅस्ट्रेलियातील आगीचे संकट पाहता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी १३ जानेवारीपासून सुरूहोणारा आपला चार दिवसांचा दौरा रद्द केला आहे.
अर्थात, आगामी महिन्यात आपला दौरा पुन्हा निश्चित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या दौºयात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते. स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे की, आमचा देश सध्या जंगलातील भीषण आगीच्या संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे.