चीनमधील अलिशान हॉटेलला आग, 10 जणांचा मृत्यू
By Admin | Published: February 25, 2017 03:25 PM2017-02-25T15:25:52+5:302017-02-25T15:25:52+5:30
दक्षिणपूर्व चीनमधील नानचांग शहरातील एका अलिशान हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
>ऑनलाइन लोकमत
पेइचिंग, दि. 25 - दक्षिणपूर्व चीनमधील नानचांग शहरातील एका अलिशान हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलच्या नुतनीकरणाचं काम चालू असल्याने आग लागल्यानंतर काही लोकांसह कामगारही हॉटेलमध्ये अडकले होते.
आग लागल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामधून आगीचं भयंकर रुप समोर येत होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, आतमध्ये अजून काही लोक अडकले आहेत का याची पाहणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चार मजले असलेल्या या हॉटेलच्या दुस-या मजल्यावर सकाळी 8 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. हॉटेलजवळच 24 मजल्यांची एक इमारत आहे. इमारतीत राहत असलेल्या महिलेने सांगितल्याप्रमाणे 10 कामगार दुस-या माळ्यावर काम करत होते. आग लागताच त्यांच्यातील एकाने दुस-या माळ्यावरुन खाली उडी मारली. तो जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.