रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:15 PM2022-09-26T15:15:12+5:302022-09-26T15:21:19+5:30
मृतांमध्ये शालेय विद्यार्थी तसेच सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
रशियातील इझवेस्क (Izhevsk) शहरातील एका शाळेत सोमवारी झालेल्या गोळीबारात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. रशियाच्या गृहमंत्र्यांनी स्वतःच यासंदर्भात माहिती दिली आहे. रशियतील तास या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका बंदूकधारी हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. तसेच त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.
मृतांमध्ये शालेय विद्यार्थी तसेच सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यानंतर, रेस्क्यू टीमने विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. Udmurtia भागाचे गव्हर्नर अलेक्झँडर ब्रेकालव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती Pushkinskaya स्ट्रीटवर असलेल्या शाळेत घुसली आणि तिने सुरक्षारक्षकावर गोळी झाडली. गोळिबाराचा आवाज ऐकताच विद्यार्थी आपल्या वर्गात लपले.
विशेष म्हणजे, शाळेत क्लासेस सुरू असतानाच ही फायरिंग सुरू झाली. माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित हल्लेखोराने शाळेच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या रूम नंबर 403 मध्ये स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.