कॅनडात इस्लामिक सेंटरमध्ये गोळीबार, ६ ठार, ८ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 12:45 AM2017-01-31T00:45:08+5:302017-01-31T00:45:08+5:30
कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.
क्युबेक सिटी : कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.
क्युबेक पोलिसांचे प्रवक्ते ख्रिस्तीन कौलोंब यांनी या गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक केल्याचे सांगितले. तिसरा संशयित फरार असल्याची शक्यता त्यांना वाटत आहे. हल्ल्यामागील नेमके कारण मात्र समजलेले नाही. रात्री आठ नंतर गोळीबार झाला त्यावेळी काही डझन लोक या सेंटरमध्ये होते, असे सीबीसीने वृत्त दिले.
मशिदीत सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर हल्ला झाला. मशिदीमध्ये चेहरा झाकलेले दोन लोक शिरले व त्यांनी गोळीबार सुरू केला, असे साक्षीदाराच्या हवाल्याने रेडिओ-कॅनडाने वृत्त दिले.
हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांनी सोमवारी म्हटले. प्रार्थनास्थळी आणि निर्वासितांच्या केंद्रावरील या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे त्रुदेऊ यांनी निवेदनात म्हटले. मुस्लीम-कॅनेडियन हे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा महत्वाचा भाग आहेत. अशा स्वरुपाच्या हिंसाचाराला आमच्या समाजात, शहरात व देशात कोणतीही जागा नाही, असे त्रुदेऊ म्हणाले.
रात्री ७.१५ च्या सुमारास चेहरे झाकलेले दोन बंदूकधारी या केंद्रात शिरले. ठार झालेले ३५ ते ७० या वयोगटातील आहेत. त्रुदेऊ यांनी मुस्लीम आणि निर्वासितांचे कॅनडामध्ये स्वागत आहे, असे म्हटल्यानंतर हल्ला झाला. (वृत्तसंस्था)