काबुल विमानतळावर गोळीबारानंतर प्रचंड गोंधळ; अमेरिकेनं हाती घेतलं नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:49 AM2021-08-16T08:49:13+5:302021-08-16T10:06:58+5:30
अमेरिका ६ हजार सैनिक उतरवण्याच्या तयारीत; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक
काबूल: तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसागणिक बिघडत आहे. लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. यातल्या काहींनी पाकिस्तानात आश्रय घेतला. काही जणांनी काबूल विमानतळावर धाव घेतली आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेकांसमोर काबुल हाच एकमेव पर्याय उरला असताना आज तिथेही गोळीबार झाला आणि परिस्थिती बिघडली. गोळीबार होताच विमानतळावर एकच गोंधळ झाला. लोक सैरावैरा पळू लागले. त्यात अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. सध्या अमेरिकेनं काबूल विमानतळ ताब्यात घेतला आहे. अमेरिका ६ हजार सैनिक काबुलमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत असताना आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. राजधानी काबूलमधील विमानतळावर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. काबुल विमानतळावरील परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून परिस्थितीचं गांभीर्य आणि भीषणता दिसून येत आहे.
Another Saigon moment: chaotic scenes at Kabul International Airport. No security. None. pic.twitter.com/6BuXqBTHWk
— Saad Mohseni (@saadmohseni) August 15, 2021
काबूल विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात; ६ हजार सैनिक उतरवणार
अफगाणिस्तानात अडकलेल्या स्वकियांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काबुल विमानतळावरील परिस्थिती बिघडत असल्याचं दिसताच अमेरिकेनं विमानतळावर नियंत्रण मिळवलं. काबुलमधल्या हमीद करझाई विमानतळाला सुरक्षा देण्यासाठी पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयानं दिली. हवाई वाहतूक नियंत्रणदेखील अमेरिकेच्या ताब्यात आहे.
Awful, chaotic scenes at Hamid Karzai International Airport. People scrambling and no where to go. Woman says "look at the state of the people of Afghanistan" #Kabulpic.twitter.com/5Ohe1c81uB
— Yalda Hakim (@BBCYaldaHakim) August 15, 2021
भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राची बैठक
अफगाणिस्तानातील परिस्थिती वेगानं बिघडत चालली आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची सकाळी १० वाजता बैठक होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद भारताकडे आहे. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीबद्दल संयुक्त राष्ट्रानं याआधी चिंता व्यक्त केली होती.