न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:40 AM2019-03-16T06:40:57+5:302019-03-16T06:41:33+5:30

मृतांमध्ये ९ भारतीय; बांगलादेशचा क्रिकेट संघ बचावला

Firing in New Zealand; Live jokes on Facebook | न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार

न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार

googlenewsNext

ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जण ठार झाले असून, २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. उजव्या विचारसरणीच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाने मुस्लिमांविषयीच्या रागातून हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गोळीबार करताना त्याने फेसबुक लाइव्ह (ऑनलाइन) केल्याने हा गोळीबार लोकांना थेट पाहायला मिळाला. हा व्हिडीओ भयानकच होता. या प्रकारामुळे न्यूझीलंडमध्ये घबराट पसरली. पंतप्रधान जासिंडा अर्डर्न यांनी हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमधील ९ भारतीय बेपत्ता झाले असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. ते गोळीबारात मरण पावले असावेत, असा अंदाज आहे. हैदराबादमध्ये राहणारे दोन जण गोळीबारात जखमी झाल्याची माहिती एमआयएमचे नेते असउद्दिन ओवेसी यांनी सांगितले.

गोळीबार झाला, तेव्हा बांगलादेशचा क्रिकेट संघ मशिदीत नमाजासाठी प्रवेश करणारच होता, परंतु गोळीबाराचे वृत्त समजताच सारे खेळाडू जवळच्या ठिकाणी निघून गेली. संघ एका हॉटेलमध्ये मुक्काम होता. गोळीबारानंतर न्यूझीलंड-बांगलादेश कसोटी सामना दौराच रद्द केला. या गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमध्ये कोणाला येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, माथेफिरूने खूपच जवळून गोळीबार केला. मृतात महिला व मुलांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, गोळीबार करणारा माथेफिरू हा उजव्या विचारसणीचा दहशतवादी आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लिमांचे जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे, त्याला विरोध करण्यासाठी त्याने गोळीबार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सांगितले, गोळीबार करणारे किती जण होते, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकावर गोळीबाराचा आरोप आहे. लष्कराच्या वापरातील दोन आईईडी जप्त व निष्क्रिय केले आहे.
मशिदीतील पॅलिस्टिनी नागरिकाने सांगितले की, आपण एकाच्या डोक्यात गोळी लागलेली पाहिली. तीन गोळ्यांचा आवाज ऐकू आला. १० सेकंदांनंतर पुन्हा असेच आवाज ऐकू आले. हल्लेखोरांकडे स्वयंचलित शस्त्र होते.

पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ कृपया शेअर करू नये. आम्ही फूटेज हटविण्याचा प्रयत्न करत आहोत. अल नूर मशिदीत झालेल्या हल्ल्यात ४२ लोकांचा तर लिनवुड अवे मशिदीत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मशिदी पाच किमी अंतरावर आहेत. दोन्ही मशिदीत एकाच हल्लेखोराने गोळीबार केला होता का, हे स्पष्ट झाले नाही.

लिनवुड अवे मशिदीत नमाजासाठी आलेल्या एकाने सांगितले की, माझ्या पत्नीचा मृतदेह फुटपाथवर पडला होता. लोक पळत होते. काही लोक रक्तबंबाळ झाले होते. दुसरा म्हणाला की, मुलांवर गोळीबार होत असल्याचे मी पाहिले. माझ्या चारही बाजूंना मृतदेह पडले होते.
डोक्याला कॅमेरा लावून चित्रण

ऑनलाइन व्हिडीओ व दस्तऐवजातून स्पष्ट होते की, स्वत: माथेफिरूनेच गोळीबाराचा व्हिडीओ तयार केला. त्याने बहुधा हेल्मेट घातले होते आणि त्यावर कॅमेरा बसविला होता. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातातील रायफल व तो करीत असलेला गोळीबार स्पष्टपणे दिसत आहे.

Web Title: Firing in New Zealand; Live jokes on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.