लंडनमध्ये ऑक्सफोर्ड स्टेशनजवळ गोळीबार, भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:33 PM2017-11-24T23:33:07+5:302017-11-25T07:16:30+5:30
ब्रिटनची राजधानी लंडनमधील ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्टेशनवरील लोक धावताना दिसले.
लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमधील ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्टेशनवरील लोक धावताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी ब्लॅकफ्रायडे निमित्ताने या स्टेशन परिसरात लोकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा गोळीबार करण्यात आल्यानंतर उपस्थित लोकांनी धावपळ केली.
तर, गोळीबारात एक महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रोपॉलिटन आणि ब्रिटन ट्रान्सपोर्ट पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत स्टेशनवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आले. तसेच, स्टेशन परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशन आणि बॉन्ड स्ट्रीट स्टेशन बंद केले आहे. दरम्यान, हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास मेट्रोपॉलिटन आणि ब्रिटन ट्रान्सपोर्ट पोलीस संयुक्तरित्या करत आहेत. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याचे समजते.
Daily Mail one of the UK’s biggest newspaper tweeted about a lorry ploughing into people at Oxford Circus, then deleted it when it turns out to be fake news. Well that’s one way to spread a rumor. pic.twitter.com/nULu0G4lbe
— Stephen Brian Lowe (@SBrianLowe) November 24, 2017
गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा लंडनमध्ये दहशतावद्यांनी स्फोट घडवून आणला होता. भुयारी रेल्वेत 15 सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी दुस-याही व्यक्तीला अटक केली होती. स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी शाखेने 21वर्षांच्या व्यक्तीला पश्चिम लंडनमध्ये अटक केली. हा स्फोट आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला होता. डोव्हर भागातील पोर्टमध्ये 18 वर्षांच्या व्यक्तीला अटक झाली असून, त्या दोघांची नावे जाहीर केलेली नाहीत. ब्रिटनच्या दहशतवाद कायद्याखाली या दोघांना अटक झाली.
तत्पूर्वी सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले होते. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत 18 प्रवासी जखमी झाले होते. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला होता.
हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले होते.
पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली होती.