अमेरिकेत पोलिसांवर गोळीबार; पाच ठार
By admin | Published: July 9, 2016 02:45 AM2016-07-09T02:45:22+5:302016-07-09T02:45:22+5:30
अमेरिकेत आंदोलनादरम्यान काहींनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात पाच अधिकारी ठार, तर सात जखमी झाले. डलास शहरात गुरुवारी रात्री करण्यात आलेला हा हल्ला देशातील
ह्युस्टन : अमेरिकेत आंदोलनादरम्यान काहींनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात पाच अधिकारी ठार, तर सात जखमी झाले. डलास शहरात गुरुवारी रात्री करण्यात आलेला हा हल्ला देशातील पोलिसांवरचा आजवरचा सर्वांत घातक हल्ला ठरला. पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर अलीकडेच गोळीबार केला होता. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. दोन बंदूकधारी उंच ठिकाणी दबा धरून बसले होते. त्यांनी हल्ला केला, असे डलासचे पोलीस प्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी येथे सांगितले. पोलिसांनी एका संशयिताशी वाटाघाटीचा प्रयत्न केला. तथापि, हा प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर झालेल्या चकमकीत हा संशयित मारला गेला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सीएनएन या वाहिनीला सांगितले. मात्र, तो नेमका कसा ठार झाला हे स्पष्ट केले
नाही.
उपाहारगृहे असलेल्या वर्दळीच्या भागात बॉम्ब पेरण्यात आल्याची धमकी संशयितांनी दिली होती. वाटाघाटी सुरू असताना एका संशयिताने त्यांचा (पोलिसांचा) शेवट जवळ आलेला आहे. गॅरेज तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी बॉम्ब पेरले असल्याचे म्हटले होते. या संशयिताचे आणखी काही जोडीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ब्राऊन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात होते, असे मानून पोलीस अधिकारी तपास करीत आहेत.
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर एका संशयिताला काल रात्री अटक करण्यात आली होती. त्याच्या जवळ संशयास्पद पाकीट आढळले असून, ते बॉम्बशोधक व नाशक पथकाने ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटना थांबत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. ओबामा नाटो परिषदेसाठी वॉरसा येथे आहेत. त्यांनी डलासमधील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. पोलीस अधिकाऱ्यांना अनेक संशयितांकडून लक्ष्य केले जात असून हा प्रकार निदंनीय आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
का झाला
हा गोळीबार?
गेल्या चार दिवसांत अमेरिकेत दोन कृष्णवर्णीय तरुणांना तेथील पोलिसांनी कोणत्याही कारणांविना गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या निषेधार्थ गौर व कृष्णवर्णीय लोकांनी गुरुवारी संध्याकाळी मोर्चा काढला. त्या मोर्चातील काहींनी अचानकपणे पोलिसांवर
गोळीबार केला.