अमेरिकेत कैद्याचा न्यायालयात गोळीबार
By admin | Published: July 13, 2016 02:42 AM2016-07-13T02:42:07+5:302016-07-13T02:42:07+5:30
कैद्याने न्यायालय इमारतीत केलेल्या गोळीबारात दोन न्यायालयीन कर्मचारी ठार, तर पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत.
ह्युस्टन : कैद्याने न्यायालय इमारतीत केलेल्या गोळीबारात दोन न्यायालयीन कर्मचारी ठार, तर पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला. अमेरिकेच्या मिशिगन राज्यात सोमवारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्याला ‘बेर्र्रियन काउंटी कोर्ट’ संकुलातील कोठडीतून हलविण्यात येत होते, तेव्हा त्याने पोलिसाची बंदूक हिसकावून चार जणांवर गोळीबार केला, असे बेर्रियन काउंटीचे शेरीफ पॉल बॅली यांनी सांगितले. हल्लेखोराने आधी उप शेरीफ अधिकाऱ्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर, दोन न्यायालयीन कर्मचाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले. त्याची गोळी लागून एक नागरिकही जखमी झाला. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केल्यानंतर न्यायालय इमारतीतील रक्तपात थांबला.
गोळीबार सुरू होताच न्यायालय इमारतीतील लोकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. तथापि, इतर शूर अधिकारी घटनास्थळी धावले आणि त्यांनी हल्लेखोराला लोळविले, असे बॅली म्हणाले. गोळीबारात जखमी झालेला नागरिक आणि उप शेरीफ यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे बॅली यांनी सांगितले. कैैद्याला कोणत्या कारणांमुळे कोठडीत डांबण्यात आले होते, हे अधिकाऱ्यांनी लगेचच स्पष्ट केले नाही. पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)