बगदादमध्ये आंदोलनकर्त्यांवर अज्ञातांचा गोळीबार; 16 ठार, 45 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 09:17 AM2019-12-07T09:17:11+5:302019-12-07T09:18:30+5:30
इराकच्या गृहमंत्रालयाने सांगितले की हल्लेखोर कारच्या ताफ्यामधून आले होते. त्यांनी बगदादच्या अल-खलानी स्क्वेअरमध्ये घुसून आंदोलनासाठी जमलेल्या लोकांवर गोळीबार केला.
बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत 16 जण ठार झाले असून 45 जण जखमी झाले आहेत.
इराकच्या गृहमंत्रालयाने सांगितले की हल्लेखोर कारच्या ताफ्यामधून आले होते. त्यांनी बगदादच्या अल-खलानी स्क्वेअरमध्ये घुसून आंदोलनासाठी जमलेल्या लोकांवर गोळीबार केला.
अल-खलानी हा परिसर दोन महिन्यांपूर्वी सरकारविरोधी चळवळीनंतर आंदोलकांच्या ताब्यात आहे. हा परिसर तहरीर स्क्वेअरच्या बाजुला आहे. या आंदोलनानेच पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. इराकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक आदोलने सुरू आहेत. यानंतर संसदेत कॅबिनेटचा राजीनामा 1 डिसेंबरला मंजूर करण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, शिया राजकीय संघटनांनी आणि मिलिशिया सदस्यांनी घुसखोरी करत हल्ला केला. गेल्या दोन महिन्यांत हिंसक आंदोलनांमुळे 420 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.