रोहिंग्या शरणार्थी शिबिरावर अंदाधुंद गोळीबार, किमान 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 02:24 PM2021-10-22T14:24:34+5:302021-10-22T14:24:45+5:30
काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
ढाका: बांग्लादेश-म्यानमार सीमेवरील रोहिंग्या निर्वासित छावणीत शुक्रवारी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात किमान सात जण ठार झाले आहेत. एक स्थानिक पोलिस प्रमुखाने सांगितलं की, हल्लेखोरांनी काही जणांना गोळ्या घालून आणि काहींना चाकू भोसकून ठार केलंय. तीन आठवड्यांपूर्वीच रोहिंग्याच्या एका नेत्याची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
निर्वासित छावणीत असलेल्या मदरशावर हल्ला
सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेश-म्यानमार सीमेवीरल उखिया येथील कॅम्प क्रमांक 18 च्या ब्लॉक एच-52 मध्ये पहाटे 4 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. रोहिंग्या शरणार्थी शिबिरात असलेल्या मदरशात हा हल्ला झाला. गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
3 आठवड्यांपूर्वी रोहिंग्या नेत्याची हत्या
यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी बांग्लादेशमधील एका छावणीत एका रोहिंग्या निर्वासिताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॉक्स बाजार जिल्ह्यातील उखिया येथील कुतुपालोंग निर्वासित शिबिरात अज्ञात हल्लेखोरांनी मोहिबुल्लाहवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मोहिबुल्ला पेशाने शिक्षक होते आणि निर्वासितांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये स्थानिक मुस्लिम गटांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवक्ते होते. 2019 मध्ये ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धार्मिक स्वातंत्र्यावरील बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या परिस्थितीवर चर्चा केली होती.