ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार

By admin | Published: August 23, 2015 03:38 AM2015-08-23T03:38:11+5:302015-08-23T05:22:24+5:30

अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला जाणाऱ्या एका हायस्पीड रेल्वेत शुक्रवारी रात्री काही सेकंद गोळीबार झाला आणि काही कळण्याच्या आतच धावपळ उडाली. अमेरिकेच्या दोन नागरिकांनी गोळीबार

Firing on the train | ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार

ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार

Next

अराज : अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला जाणाऱ्या एका हायस्पीड रेल्वेत शुक्रवारी रात्री काही सेकंद गोळीबार झाला आणि काही कळण्याच्या आतच धावपळ उडाली. अमेरिकेच्या दोन नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मोरोक्कोच्या २६ वर्षीय तरुणाला पकडले आणि अनर्थ टळला. काही मिनिटातच घडलेल्या या घटनेने रेल्वेतील ५५० प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकविला. दरम्यान, या झटापटीत तीन प्रवासी जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अगदी कल्पनेनेही अंगावर काटा उभा करणाऱ्या या घटनेची माहिती अशी की, ही रेल्वे शुक्रवारी रात्री अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला निघाली. अमेरिकी सैन्याचे सदस्य असलेले २२ वर्षीय अलेक स्कार्लाटोस आणि स्पेन्सर स्टोन हे या रेल्वेतून प्रवास करत होते. स्कार्लाटोस याने सांगितले की, एका गार्डला त्यांनी पळताना पाहिले आणि नेमके काय होत आहे हे कळायच्या आतच गोळीबाराचा आवाजही आला. गार्डपाठोपाठ स्कार्लाटोसचा सहकारी स्पेन्सर हा आवाजाच्या दिशेने धावला. एव्हाना रेल्वेतील प्रवाशांना काही तरी अघटित घडत असल्याची कल्पना आली होती. काही सेकंदासाठी झालेल्या या धावपळीत स्पेन्सरने अक्षरश: मोरोक्कोच्या त्या युवकाकडे झेप घेतली आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकावली. तोपर्यंत या युवकाने स्पेन्सरवर चाकूहल्ला चढविला. या सर्व झटापटीत स्पेन्सरने या तरुणाला पकडण्यात यश मिळविले. स्कार्लाटोस सांगतो की,अगदी गोळीबार सुरू असतानाही स्पेन्सरने हिंमत करून थेट त्या युवकाच्या दिशेने झेप घेतली. जर गोळी कुणाला लागलीच असती तर तो स्पेन्सरच असला असता, पण सुदैवाने असे काही झाले नाही. या घटनेनंतर या तरुणाला अटकही करण्यात आली आहे.
माझी बंदूक परत द्या हो...
रेल्वेत मोरोक्कोच्या बंदूकधारी तरुणाला पकडल्यानंतर त्याच्याकडून बंदूक हस्तगत करण्यात आली. त्यानंतरही माझी बंदूक परत द्या हो, अशी विनवणी तो करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (वृत्तसंस्था)

- पॅरिसमध्ये जानेवारीत एका बंदूकधारी इसमाने १७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रेल्वेतील या गोळीबाराच्या घटनेने भीतीची छाया गडद झाली आहे. दरम्यान, बंदूक घेऊन रेल्वेत प्रवेश मिळविणाऱ्या या तरुणाबद्दलचे गूढ वाढले असून मोरोक्कोच्या या युवकाचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहे का आदी बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. अमेरिकन सैन्याच्या दोन जवानांनी या तरुणाला पकडून मोठी दुर्घटना टाळल्याने या जवानांना शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Firing on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.