चीनने बांधली पहिली विमानवाहू युद्धनौका
By admin | Published: April 27, 2017 01:16 AM2017-04-27T01:16:05+5:302017-04-27T01:16:05+5:30
साता समुद्रापलीकडेही दबदबा निर्माण करणारे नौदल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने पूर्णपणे देशी
बिजिंग : साता समुद्रापलीकडेही दबदबा निर्माण करणारे नौदल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले. अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला आहे.
उत्तरेकडील दालियान बंदरातील नौकाबांधणी आवारात ही युद्धनौका बांधली गेली. बुधवारी सकाळी वरिष्ठ नौदल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक समारंभ झाल्यानंतर या युद्धनौकेने बर्थ सोडून प्रथमच समुद्रात प्रस्थान केले.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार ‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३ मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५ मध्ये सुरु झाली होती. सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका सन २०२० पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
या नव्या युद्धनौकेचे नाव अद्याप अधिकृतपणे ठरलेले नाही. परंतु तिचा स्थायी मुक्काम शॅन्डाँग प्रांतातील क्विंगदाओ नौदल तळावर राहणार असल्याने कदाचित तिचे नाव ‘शॅन्डाँग’ ठेवले जाईल, अशी अटकळ चिनी प्रसिद्धीमाध्यमांत वर्तविण्यात आली आहे. सन २०२० पर्यंत नौदलाचा झपाट्याने विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा मिळून एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे. यात चीन देशी बनावटीच्या आणखी दोन ते तीन विमानवाहू युद्धनौकाही बांधेल, असे समजते. या कामगिरीने हा कम्युनिस्ट देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या निवडक देशांच्या पंक्तींत पोहोचणार आहे.
(वृत्तसंस्था)