सौदीत महिलांसाठी पहिले कार शोरूम; कर्मचारीही महिलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:13 AM2018-01-13T02:13:05+5:302018-01-13T02:13:21+5:30
मागील वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी महिलांना कार चालविण्याचा अधिकार दिल्यानंतर, पाचच महिन्यांनी येथे एका खासगी कंपनीने महिलांसाठी कार शोरूम सुरू केले आहे. पश्चिम लाल सागराच्या बेटानजीक एका शॉपिंग मॉलमध्ये हे शोरूम सुरू करण्यात आले आहे.
जेद्दाह : मागील वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी महिलांना कार चालविण्याचा अधिकार दिल्यानंतर, पाचच महिन्यांनी येथे एका खासगी कंपनीने महिलांसाठी कार शोरूम सुरू केले आहे. पश्चिम लाल सागराच्या बेटानजीक एका शॉपिंग
मॉलमध्ये हे शोरूम सुरू करण्यात आले आहे.
ते शोरूम केवळ महिलांकडून चालविण्यात येत आहे. त्यामुळे येथील सर्व कर्मचारी महिला आहेत. देशात महिलांसाठी आणखी शोरूम सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे.
महिलांना ड्रायव्हिंग करण्यावरील बंदी हटविण्यात येत असल्याची घोषणा सौदी अरेबियाने सप्टेंबरमध्ये केली होती. त्या आधी राजधानी रियाधमध्ये कार चालविण्याचा प्रयत्न करणाºया महिलांना १९९० मध्ये अटक करण्यात आली होती.
आता महिलांना लायसन्स जारी करण्याचे काम जूनमध्ये सुरू करण्यात येणार आहे. काही कामानिमित्त बाहेर जाणे किंवा शाळेतील मुलांना नेण्या-आणण्यासाठी या महिलांना कार
हा मोठा आधार होणार आहे.
यापूर्वी कारमधून बाहेर जाण्यासाठी त्यांना नातेवाईक, घरातील
पुरुषांवर अवलंबून राहावे लागत होते. (वृत्तसंस्था)
मनाल अल-शरीफ या महिलेने कार चालविण्यास असलेल्या बंदीविरुद्ध संघर्ष केला आहे. ही महिला म्हणते की, आम्ही महिलांनी गप्प राहून चालणार नाही. ‘डेअरिंग टू ड्राइव्ह’ही तिची मोहीम आहे. तिने २०११ मध्ये ड्रायव्हिंग करून त्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. तिच्या या मोहिमेला व संघर्षाला आता यश आले असून, महिलांना कार चालविण्यास परवानगी मिळाल्यानंतर फक्त महिलांचे कार शोरूम हे पुढचे पाऊल समजले जात आहे.