शेख हसीना यांच्यावर पहिला गुन्हा दाखल; दुकानदाराच्या हत्येचा आरोप ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:59 PM2024-08-13T15:59:52+5:302024-08-13T16:00:10+5:30
हसीना या सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच्या हिंसाचारात २३० जण मारले गेले आहेत. तर एकूण मृतांची संख्या ५६० झाली आहे.
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीच्या मृत्यूवरून हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसीना यांनी त्या पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर हसीना यांना परतल्यास अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
हसीना यांच्यावर दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. बांगलादेशी प्रसारमाध्यमांनुसार एका किराणा मालाच्या दुकानदाराच्या हितचिंतकांनी हा गुन्हा दाखल केला आहे. १९ जुलैला पोलिसांच्या गोळीबरात अबू सईद याचा मृत्यू झाला होता.
शेख हसीना यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल मामून, अवामी लीगचे महासचिव ओबेदुल कादर, माजी गृह मंत्री असदुज्जमां खान कमाल यांचेही नाव आहे. यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी बनविण्यात आले आहे. एकीकडे बीएनपीने राष्ट्रपतींनी खालिदा जिया आणि त्याच्या मुलावरील गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी केलेली असताना दुसरीकडे हसीना यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
हसीना देश सोडून गेल्या, नवे अंतरिम सरकार स्थापन झाले तरी बांगलादेशातील हिंसाचार काही थांबलेला नाही. आज आंदोलकांनी ढाक्यातील सेतू भवनाला लक्ष्य केले आहे. रस्ते, परिवाहन आणि पूल विभागाचे हे कार्यालय आहे. दगडफेक करत कार्यालयाची मोडतोड केली तसेच तिथे लावलेल्या गाड्यांना आग लावण्यात आली.
हसीना या सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच्या हिंसाचारात २३० जण मारले गेले आहेत. तर एकूण मृतांची संख्या ५६० झाली आहे. अंतरिम सरकारच्या नेतृत्वात सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.