सौदी अरेबियात नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना पहिला हक्क! भारतीयांवर येणार गदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 12:02 PM2017-08-24T12:02:39+5:302017-08-24T12:56:20+5:30
सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.
रियाध, दि. 24 - सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने निताकतमध्ये केलेल्या बदलामुळे तिथल्या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सौदीमधील हायग्रेडच्या काही ठराविक कंपन्यांना त्यांच्याकडे असलेली सौदी कर्मचा-यांची संख्या आणि अन्य निकषांच्या आधारावर परदेशी कर्मचा-यांच्या व्हिसासाठी अर्ज करता येतील.
या निर्णयामुळे सौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदीमध्ये वेगवेगळया सेक्टरमध्ये लाखो भारतीय नोकरी करत आहेत. 2016 मध्ये सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या 25 लाख होती. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आहे.
2016 मध्ये सौदी अरेबियाचे 1.65 लाख व्हिसा मंजूर करण्यात आले होते. 2015 च्या तुलनेत त्यात 46 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठया संख्येने तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला जातात.
सौदीत कुटुंब कर
सौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.
सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.