अंतराळात फुलले पहिले फूल!
By admin | Published: January 18, 2016 03:54 AM2016-01-18T03:54:32+5:302016-01-18T03:54:32+5:30
अवकाशात प्रथमच झिनियाचे फूल फुलले आहे. हे फूल केवळ सौंदर्यासाठी फुलविण्यात आलेले नसून त्यामागे वैज्ञानिक उद्देश आहे, असे ‘नासा’ने म्हटले.
वॉशिंग्टन : अवकाशात प्रथमच झिनियाचे फूल फुलले आहे. हे फूल केवळ सौंदर्यासाठी फुलविण्यात आलेले नसून त्यामागे वैज्ञानिक उद्देश आहे, असे ‘नासा’ने म्हटले. मंगळावरील प्रदीर्घकाळच्या मोहिमांच्या आयोजनात या कौशल्याचा उपयोग होईल, असे नासाने सांगितले.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) छोटेसे हायड्रोपोनिक शेत २०१४च्या वसंत ऋतूत तयार झाले होते. पहिल्या प्रयत्नात झिनियाचे रोप वाळून गेले होते. त्यानंतर अंतराळवीरांनी त्याच्या आहारात बदल केले. त्याआधी या केंद्रावर कोथिंबीर पिकविण्यात आली होती.
अंतराळात भाजी पिकविण्याच्या प्रयत्नांतून प्रथमच झिनिया हे फूल यशस्वीरीत्या फुलविले गेले. या प्रयत्नांतून अंतराळात लागवडीसाठी स्वतंत्र अशी जागा तयार करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकेल. झिनियाचा अपक्वतेचा काळ हा खूपच जास्त ८० दिवस असतो व ते फूल बाहेरील परिस्थितीत खूप संवेदनशीलही असते, असे तज्ज्ञांचम्हणणे आहे. या प्रकल्पाचे समन्वयक ट्रेंट स्मिथ म्हणाले की अशा लहरी रोपांची लागवड करण्यातून आयएसएसकडील उपकरणे आणि अंतराळवीर हे अशा लागवडीसाठी किती सज्ज आहेत हे दिसले.
याआधी पिकविल्या भाज्या
नासाचे अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली यांनी झिनियाची छायाचित्रे पाठविली आहेत. स्वत: केली यांनी टिष्ट्वटरद्वारे ही माहिती दिली. अवकाशात दुसऱ्या स्वरुपाचे जीवन आहे. नारिंगी रंगाचे हे झिनिया फूल दक्षिण पश्चिम अमेरिकेमध्ये अगदीच काही अपरिचित नाही. आयएसएसवर भाज्या पिकविण्याचा प्रयोग वर्षभरापूर्वी सुरू झाला होता व १० आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदा अंतराळवीरांना कोथिंबीर घेण्यात यश आले होते. आयएसएसवर वेगी सिस्टीमने (भाजी पिकविण्याची पद्धत) मे २९१५ मध्ये भाज्यांचे यशस्वी पीक घेण्यात आले होते. दिसत नसलेला प्रकाश आणि निर्वात पोकळीत (वेटलेसनेस) रोपांना वाढण्याला प्रेरणा देण्यासाठी ही सिस्टीम निळे, हिरवे व लाल लेड दिव्यांनी सज्ज आहे.
तुमची बाग कशी आहे? येथे अवकाशात माझी बाग फुलली आहे, असे स्कॉट यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी टिष्ट्वटरवर म्हटले. स्कॉट केली हे अमेरिकन अंतराळवीर असून ते अभियंता आणि अमेरिकन नौदलातून कप्तान म्हणून निवृत्त आहेत. अंतराळातील या आधीच्या तीन मोहिमांतही ते सहभागी होते. नंतर त्यांची वर्षभर चालणाऱ्या व मार्च २०१५ मध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र मोहिमेसाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये निवड करण्यात आली होती.