'ही' होणार पाकिस्तानातील पहिली हिंदू महिला खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 10:25 AM2018-02-13T10:25:43+5:302018-02-13T10:54:13+5:30
पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी ३ मार्च रोजी निवडणुका होत आहेत.
कराची: पुढील महिन्यात सिनेटसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानात नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीतर्फे हिंदू महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून प्रथमच हिंदू महिलेस संसदेत जाता येणार आहे. सिंध प्रांतामधून कृष्णा कुमारी यांना ही संधी मिळत असून पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी ३ मार्च रोजी निवडणुका होत आहेत. कृष्णा कुमारी यांना विजयी करण्यासाठी 'पीपीपी'ने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थर विभागातील असून त्या नगरपारकर जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्या रुपलू कोल्ही या स्वातंत्र्यसैनिकाच्या वंशज आहेत. १८५७ साली सिंध प्रांतावर ब्रिटीश फौजांनी हल्ला केला होता तेव्हा रुपलू यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता. सामाजिक कार्य करणाऱ्या कृष्णा यांनी पीपीपी पक्षाद्वारे राजकारणात प्रवेश केला. त्यांचे बंधूही याच पक्षात असून ते बेरानो शहराचे नगरप्रमुख होते. कृष्णा कुमारी यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. सोळा वर्षांच्या असताना लालचंद यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतरही त्यांनी शिक्षण सुरुच ठेवले. सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.
कृष्णा यांनी सिंध प्रांतात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले आहे. पक्षाने ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी 'पीपीपी'च्या सदस्या बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपद भुषवले होते. तर हिना रब्बानी खार यांनी परराष्ट्रमंत्री आणि फेहमिदा मिर्झा यांनी पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळवला होता.