९० वर्षांच्या आजींना युकेत देण्यात आली 'फायझर'ची पहिली लस
By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 03:52 PM2020-12-08T15:52:17+5:302020-12-08T15:57:06+5:30
युकेमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.
'फायझर' कंपनीच्या कोरोनावरील लशीची लसीकरण मोहीम आजपासून युकेमध्ये सुरु झाली आहे. 'युके'त ९० वर्षांच्या आजींना फायझरच्या लशीचा सर्वात पहिला डोस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डोस देण्यात आलेल्या मार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात ९१ वर्षांच्या होणार आहेत आणि आपल्याला मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
येत्या काही आठवड्यांमध्ये आता युकेमध्ये फायझर-बायोएनटेकच्या पहिल्या टप्प्यातील ८ लाख डोस देण्यात येणार आहेत. तर या महिन्याच्या अखेरीस ४० लाख डोस उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. युकेमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.
"कोरोनावर मात देणाऱ्या लशीचा पहिला डोस मला देण्यात आला याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट आहे. या वर्षातला बहुतेक काळ एकटं घालवल्यानंतर आता या लशीमुळे नवीन वर्षात मी माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकेन", असं फायझरची लस घेतलेल्या मार्गारेट म्हणाल्या. यासोबतच ज्यांना ही लस देण्यात येणार आहे त्यांनाही मार्गारेट यांनी एक संदेश दिला आहे. "जर मी ९० व्या वर्षात ही लस घेऊ शकते. तर तुम्हीही घेऊ शकता", असं म्हणत मार्गारेट यांनी इतरांनाही हुरूप देण्याचं काम केलं आहे.
'फायझर'च्या लशीला गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर या लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा 'युके' हा जगातील पहिला देश ठरला आहे.