कोरोना लसीच्या माणसांवरील चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:55 PM2020-05-24T23:55:22+5:302020-05-24T23:55:28+5:30
प्रायोगिक तत्त्वावर बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १०८ जणांना टोचण्यात आली.
वॉशिंग्टन : कोविड-१९ विषाणूवर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी माणसांवर सुरू असलेल्या चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात त्या लसीने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे. या पहिल्या टप्प्यातील चाचण्या अतिशय सुरक्षित पद्धतीने पार पडल्या, असे लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या लेखात म्हटले आहे.
प्रायोगिक तत्त्वावर बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १०८ जणांना टोचण्यात आली. त्यामुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा जोर कमी झाल्याचे आढळून आले. या संशोधनात बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ बायोटेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. या संस्थेतील एक शास्त्रज्ञ व लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचे सहलेखक वेई चेन यांनी म्हटले आहे की, सार्स-कोविड-२ विषाणूच्या संसर्गापासून ही लस माणसाचे रक्षण करू शकते का, याचाही अभ्यास होणे जरुरी असून, त्यासाठी लवकरच प्रयोग केले जातील.
या लसीचे माणसांवर किमान सहा महिने प्रयोग केल्यानंतर जे निष्कर्ष हाती येतील, ते सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यावरून ही लस खरंच किती परिणामकारक आहे हे कळू शकेल. प्रायोगिक तत्त्वावर बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे माणसांवर केलेल्या चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात चांगले परिणाम दिसून आले. याचा अर्थ आपण ही मोहम्ीा फत्ते केली, असा होत नाही.