ज्युनो यानाने पाठविले गुरुचे पहिले छायाचित्र
By admin | Published: July 14, 2016 03:11 AM2016-07-14T03:11:37+5:302016-07-14T03:11:37+5:30
१० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे.
वॉशिंग्टन : १० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे.
ज्युनो कॅमेऱ्याने १० जुलै रोजी टिपलेले हे छायाचित्र सुमारे २.७ अब्ज किमी अंतरावरून ‘नासा’च्या नियंत्रण कक्षात पोहोचायला दोन दिवस लागले. या छाचाचित्रात तप्त वायूचा महाकाय गोळा असलेला रंगीत पट्ट्यांचा गुरु ग्रह व त्याच्या चार सर्वात मोठ्या चंद्रांपैकी लो, युरोपा व गेनीमेड हे चंद्र दिसतात. गुरुच्या कक्षेत शिरल्यानंतर प्रदक्षिणा मार्गात स्थिरावत असताना, सुमारे ४.३ दशलक्ष किमी अंतरावरून घेतलेले हे छायाचित्र सुस्पष्ट नसले, तरी गुरुच्या पृष्ठभागावरील ‘रेड स्पॉट’ म्हणून ओळखला जाणारा प्रखर ठिपका त्यात दिसतो. गुरुच्या वातावरणात हजारो वर्षे सुरू असलेल्या अतिउच्च ऊर्जेच्या वादळाची खूण म्हणून हा ‘रेड स्पॉट’ ओळखला जातो.
गुरुच्या कक्षेतील २७ महिन्यांच्या वास्तव्यात ज्युनो यान या ग्रहाच्या ध्रुव प्रदेशावरून ३७ प्रदक्षिणा घालणार असून, त्याच्याकडून अधिक सुस्पष्ट छायाचित्र २७ आॅगस्ट रोजी
मिळणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)