पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील!

By admin | Published: August 5, 2016 05:38 AM2016-08-05T05:38:49+5:302016-08-05T05:39:40+5:30

‘मून एक्स्प्रेस’ कंपनीला पुढील वर्षी चंद्रावर यान पाठवून तेथे उतरण्यास अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला

The first private lunar orange lantern! | पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील!

पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील!

Next


वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीला पुढील वर्षी चंद्रावर यान पाठवून तेथे उतरण्यास अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पृथ्वीवरील आर्थिक भरभराटीसाठी शोध घेऊन त्याचा विकास करण्याची व्यावसायिक कवाडे खासगी उद्योजकांनाही खुली झाली आहेत.
आजवर जगातील अनेक देशांनी केलेल्या चांद्रसफरी व त्याही पलीकडच्या अंतराळ वाऱ्या आणि त्यासंबंधीचे संशोधन फक्त सरकारी संस्थापुरते मर्यादित होते. काही मोजक्या खाजगी अंतराळ सफरीही याआधी केल्या गेल्या. पण त्या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून पुढे गेल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर ‘मून एक्स्प्रेस’ला परवानगी देण्याचा अमेरिकी सरकारचा धोरणात्मक निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी आहे. पुढील वर्षी त्यांचे यांत्रिक अंतराळयान (रोबोटिक) चंद्रावर पाठवून तेथे उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे ‘मून एक्स्प्रेस’ने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले.
व्यापारी दृष्टीने अंतराळाचा शोध घेणे व त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे या प्रमुख उद्देशाने ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीची स्थापना झाली आहे. भारतीय
वंशाचे नवउद्योजक नवीन जैन, अंतराळ भविष्यवेत्ते डॉ. बॉब रिचर्डस आणि सतत नवनवे उद्योग काढणारे
कृत्रिम प्रज्ञा व अंतराळ तंत्रज्ञान
या क्षेत्रातील गुरु डॉ. बार्नी पेल यांनी मिळून सन २०१० मध्ये या
कंपनीची स्थापना केली.
कंपनीने पुढील वर्षाच्या चांद्रवारीसाठी ८ एप्रिल रोजी अर्ज केला होता.
अमेरिकी सरकारच्या संस्थांनी त्याची छाननी करून कंपनीला या सफरीसाठी परवानगी दिली. या सफरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्पेसशीप टू’ या अंतराळयानास परवाना दिला जाणे अपेक्षितच होते; परंतु ते चंद्रावर उतरविण्याची परवानगी मिळणे ही मोठी व्यापारी क्रांती मानली जात आहे.
पुढील वर्षी सुटकेसच्या आकाराचे लॅण्डर दोन आठवड्यांसाठी चंद्रावर पाठविण्यात येईल.
या मोहिमेद्वारे पृथ्वीच्या आर्थिक कक्षा रुंदावण्याबरोबरच अंतराळ तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि विकासाची क्षितिजेही विस्तारणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
या परवानगीने आता इतर व्यावसायिक अंतराळ मोहिमांचा मार्गही खुला होणार आहे. (वृत्तसंस्था)
>कोण आहेत नवीन जैन?
‘मून एक्स्प्रेस’चे सहसंस्थापक नवीन जैन हे नवउद्योजक आहेत. इन्फोस्पेस, इनोम आणि मून एक्स्प्रेस अशा कंपन्यांचे संस्थापक व सीईओ राहिलेले आहेत. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात ६ सप्टेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या नवीन यांनी आयआयटी रुरकीमधून शिक्षण
पूर्ण केले. त्यानंतर जमशेदपूर येथील एक्सएलआरआय स्कूल आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड ह्यूमन रिसोर्सेसमधून १९८२मध्ये एमबीए केले. १९८३मध्ये नवीन यांचा बिझनेस एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत अमेरिकी बाजारपेठेशी परिचय झाला. त्यानंंतर त्यांनी व्यावसायिक भरारी घेतली व आता तर ते अंतराळाला गवसणी घालायला निघाले आहेत.
1967 सालच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, अंतराळ मोहिमेत गैरसरकारी संस्था सहभागी नाही ना, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे. आताही परवानगी देताना अमेरिकी सरकारने अनेक नियम आखून दिले आहेत. ते चंद्र, धूमकेतू व मंगळाच्या व्यावसायिक मोहिमांना लागू असतील.
>‘मून एक्स्प्रेस’साठी आकाश ही मर्यादा नसून, अधिक पुढची झेप घेण्यासाठीचे लॉन्चपॅड आहे. पृथ्वीवर मानवाने टिकून राहण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अमर्याद भवितव्याची खात्री करण्यासाठी अंतराळात झेपावणे हाच मार्ग आहे. नजीकच्या भविष्यात बहुमोल अशी नैसर्गिक साधनसंपत्ती, किंमती धातू आणि चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणण्याचे आमचे स्वप्न आहे.
-नवीन जैन, सहसंस्थापक व अध्यक्ष, मून एक्स्प्रेस
मून एक्स्प्रेस २०१७ च्या मोहिमेला अमेरिकन सरकारने परवानगी देणे हे खूपच महत्त्वाचे पाऊल आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर व्यावसायिक अंतराळ मोहिमा राबविण्यासाठी खाजगी क्षेत्राला आता नवे आकाश खुले झाले आहे. पृथ्वीच्या आठव्या खंडावर म्हणजेच चंद्रावर संशोधन करण्यास आता आम्ही सज्ज झालो आहोत. त्याचा फायदा संपूर्ण मानवजातीला होणार आहे.
-डॉ. बॉब रिचर्डस,
अंतराळ भविष्यवेत्ते

Web Title: The first private lunar orange lantern!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.