आधी बापाचा, ६ वर्षांनी लेकीचा वाचवला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:54 AM2023-08-07T11:54:21+5:302023-08-07T11:54:32+5:30

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट असावी, अशा घटना तिघांच्या आयुष्यात घडल्या. २०१६ मध्ये अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जिनिआ येथील रिची काउण्टीमध्ये राहणारे जाॅन ...

First the father, after 6 years saved the life of the daughter! | आधी बापाचा, ६ वर्षांनी लेकीचा वाचवला जीव!

आधी बापाचा, ६ वर्षांनी लेकीचा वाचवला जीव!

googlenewsNext

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट असावी, अशा घटना तिघांच्या आयुष्यात घडल्या. २०१६ मध्ये अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जिनिआ येथील रिची काउण्टीमध्ये राहणारे जाॅन कनिंगहॅम नावाचे ६५ वर्षांचे गृहस्थ गाडी चालवत होते. गाडी चालवता चालवताच त्यांचा जीव घाबराघुबरा झाला. अस्वस्थ व्हायला लागलं. काही वैद्यकीय मदत मिळते का, हे पाहण्यासाठी कनिंगहॅम यांनी आपली गाडी  ‘काउण्टीज इमर्जन्सी मेडिकल स्टेशन’ला थांबवली. तिथे त्यांना क्रिस्टी हॅडफिल्ड भेटल्या. त्यांनी कनिंगहॅम यांची परिस्थिती पाहून लगेच त्यांना कारमध्ये घातलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. कनिंगहॅम यांना हार्ट ॲटॅक आला होता. ते बेशुध्द झाले. क्रिस्टीने त्यांना तातडीने सीपीआर  दिला. सीपीआर देताना त्या कनिंगहॅम यांना ‘जाॅन नाॅट टुडे’ असं सांगत होत्या. जाॅन कनिंगहॅम यांना सीपीआर दिला नसता तर ते वाचूच शकले नसते. 

हा प्रसंग इथेच संपला. कनिंगहॅम यांची मुलगी माॅली जोन यांना आपल्या वडिलांना वाचवणारी स्त्री कोण, याबद्दल खूप उत्सुकता होती. माॅलीने क्रिस्टी यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ती क्रिस्टी यांनी स्वीकारल्यानंतर दोघींची फेसबुकवर चांगली मैत्री झाली. जानेवारी २०२२मध्ये माॅली जोन एकाएकी खूप आजारी पडली. माॅलीला किडनीच्या गंभीर आजाराचं निदान झालं.  

माॅलीला तातडीने किडनी ट्रान्सप्लाण्ट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. पण त्यासाठी जवळपास पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार होती. मग माॅलीने किडनी मिळण्याची विनंती करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली. ही पोस्ट क्रिस्टीच्या वाचनात आली. क्रिस्टीने माॅलीला फेसबुकवर ‘तुझा रक्त गट कोणता?’ एवढाच प्रश्न विचारला. माॅलीने ए पाॅझिटिव्ह ग्रुप असल्याचं सांगितल्यानंतर क्षणाचाही विचार न करता क्रिस्टी यांनी ‘तुझी किडनी माझ्याकडे आहे!’ असा मेसेज पाठवला! केवळ फेसबुक मैत्री एवढ्याच ओळखीवर क्रिस्टी आपली किडनी माॅलीला देण्यासाठी तयार झाली.

किडनी दान करण्याचा निर्णय झाल्यानंतर क्रिस्टी यांना अतिशय कठोर अशा वैद्यकीय चाचण्यांना तोंड द्यावं लागलं. एकीकडे क्रिस्टी यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू होत्या आणि दुसरीकडे माॅलीची तब्बेत फारच खालावत होती. क्रिस्टी माॅलीला रोज मेसेज करून तिच्या तब्बेतीची विचारपूस करायची. ‘ही लढाई आपण दोघी मिळून लढतो आहोत. त्यामुळे तू मध्येच ही लढाई सोडू नकोस, हिंमत हरू नकोस’, असा मेसेज पाठवून माॅलीची हिंमत वाढवण्याचा,  तिला जगण्याची उमेद देण्याचा प्रयत्न क्रिस्टी करत  होत्या. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होण्याच्या आठ दिवस आधी क्रिस्टी आणि माॅली यांना दवाखान्यात दाखल व्हावं लागलं. तेव्हा पहिल्यांदा दोघींनी एकमेकींना प्रत्यक्षात पाहिलं. दोघींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.  माॅलीसोबत कनिंगहॅमदेखील उपस्थित होते. त्यांची तब्बेत चांगली आहे, हे पाहून क्रिस्टी यांना खूप आनंद झाला. किडनी विकारामुळे माॅलीला आपली आई गमवावी लागली. पण, विव्हला आपली आई गमवावी लागणार नाही. किडनी दिल्यानंतर  आपण आपलं काहीतरी गमावल्याचं शल्य क्रिस्टीच्या चेहेऱ्यावर नव्हतं. उलट आपण हे खूप आधी केलं असतं तर..., असं त्यांना वाटत होतं.  वडील आणि मुलगी यांच्या आयुष्यात क्रिस्टी देवदूत बनून आल्या. त्याबद्दल त्या दोघांनाही अतीव कृतज्ञता आहे.

जिवंत दात्याची किडनी लाख मोलाची!
माॅलीला जिवंत दात्याची किडनी मिळाल्यामुळे ती याबाबत फारच नशीबवान  निघाली. मृत  किडनीदात्यांच्या तुलनेत जिवंत किडनीदात्याची किडनी रुग्णासाठी खूप लाभदायी असते. एकतर ती नियोजित वेळेत काढता येते. शिवाय किडनीदाता सुदृढ असल्याने ती रुग्णाच्या शरीरात बसवल्यानंतर चांगलं काम करते आणि दीर्घकाळ टिकते.

Web Title: First the father, after 6 years saved the life of the daughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.