दशकभरात फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पहिल्यांदाच वाढ
By admin | Published: December 17, 2015 09:34 AM2015-12-17T09:34:15+5:302015-12-17T14:14:31+5:30
- अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात वाढ केली. दशकभरात पहिल्यांदाच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १७ - अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात वाढ केली. दशकभरात पहिल्यांदाच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या महामंदीमधून अमेरिका सावरत असल्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून हा निर्णय घेण्यात आला.
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता व्याजदर ०.५० टक्के झाला आहे. अमेरिकेत यावर्षी रोजगार निर्मितीमध्ये झालेली चांगली वाढ लक्षात घेऊन, फेडरलच्या समितीने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये अमेरिकेतील महामंदीमध्ये अनेक उद्योग बुडाले होते. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये कमालीची घट झाली होती. फेडरल रिझर्व्हने त्यावेळी व्याजदर कमी केल्याने
जगातील अनेक देशांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा रोजगार निर्मितीचे चक्र सुरु होऊन, अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचे जागतिक बाजारातही निश्चितच काही प्रमाणात पडसाद उमटतील.