युएईने पहिल्यांदाच भारतीय चिमुकलीसाठी नियम बदलले; वाचा कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:10 PM2019-04-29T14:10:41+5:302019-04-29T15:45:59+5:30
युएईमध्ये मुस्लिम पुरुष गैर मुस्लिम महिलेशी लग्न करू शकतो, पण मुस्लिम महिला गैरमुस्लिम पुरुषाशी लग्न करू शकत नाही.
दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक हिंदू वडील आणि मुस्लिम आई (दोन्ही भारतीय) यांच्या 9 महिन्यांच्या मुलीला नियम बदलून जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. ही घटना युएईमध्ये पहिल्य़ांदाच घडली आहे. नियमांनुसार युएईमध्य़े मुस्लिम पुरुष गैर मुस्लिम महिलेशी लग्न करू शकतो, पण मुस्लिम महिला गैरमुस्लिम पुरुषाशी लग्न करू शकत नाही.
खलीज टाईम्सनुसार शारजाहमध्ये राहणारे किरण बाबू य़ांनी सनम सिद्दीकी यांच्याशी केरळमध्ये 2016 मध्ये लग्न केले होते. दांपत्याला जुलै 2018 मध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागला जेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला.
किरण बाबू यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अबुधाबीचा व्हिसा आहे. त्यांना विम्याचे संरक्षण मिळाले आणि त्यांनी पत्नीला अमिरात मेडिओर 24X7 हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यास नकार देण्य़ात आला. कारण मुलीचे वडील हिंदू आहेत, असे देण्यात आले.
मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी तेथील न्यायालयाचे दरवाजेही खटखटावले. यावर 4 महिने युक्तीवादही झाला. पण निराशा हाती आली. यानंतर त्यांच्या मुलीकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते.
मात्र, युएईच्या प्रशासनाने 2019 हे वर्ष सहनशीलता वर्ष घोषित केल्याचा फायदा किरण यांना झाला. सौदीने त्यांच्या देशामध्ये संहिष्णुता जोपासण्यासाठी पाऊल उचलले आहे. कारण त्यांच्या देशात सर्व संस्कृतींमध्ये ताळमेळ बसविण्यासाठी आणि लोकांमध्ये एकमेकांमध्ये स्वीकार्यता येणे हा त्यामागिल उद्देश आहे.