सौदीमध्ये प्रथमच महिलांचे मतदान
By admin | Published: December 13, 2015 02:04 AM2015-12-13T02:04:00+5:302015-12-13T02:04:00+5:30
महिलांशी प्रचंड भेदाभेद करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात शनिवारी प्रथमच महिलांनी मतदान केले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणूनही महिला भविष्य
रियाध : महिलांशी प्रचंड भेदाभेद करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात शनिवारी प्रथमच महिलांनी मतदान केले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणूनही महिला भविष्य अजमावत आहेत. त्यांना निवडणुकीत उभे राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महिलांबाबत हा देश अत्यंत कर्मठ असून, निवडणुकीत मतदान करू देण्याची आणि उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी म्हणजे महिलांवरील सामाजिक निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल समजले जात आहे.
सौदी अरेबियात फक्त पालिकांसाठी निवडणूक घेतली जाते. केवळ पालिकांमध्येच निर्वाचित सदस्य असतात. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना उभे राहण्याची आणि त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. या देशात राजेशाही असून, महिलांना सक्तीने बुरखा परिधान करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना वाहन चालविण्यास बंदी आहे. निवडणुकीतही फक्त पुरुषांनाच मतदान करण्याची परवानगी होती. यामुळे सौदी सरकारचे हे पाऊल क्रांतिकारक समजले जात आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ६ हजार पुरुष आणि ९०० महिला उमेदवार आहेत.
मोफत टॅक्सी सेवा
या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित असून, महिलांना वाहने चालविण्यास बंदी आहे. त्यामुळे महिला मतदारांना मतदान करण्यास जाताना अडचण येते. ही बाब ध्यानात घेऊन देशातील एका टॅक्सी कंपनीने पुढाकार घेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत टॅक्सी सेवा देण्याचे पाऊल उचलले. (वृत्तसंस्था)