नासानं प्रसारीत केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला व्हिडीयो
By Admin | Published: February 1, 2016 01:17 PM2016-02-01T13:17:39+5:302016-02-01T14:16:10+5:30
सूर्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र टिपणारा व्हिडीयो नासाने प्रसारीत केला असून, अंतराळाचा अभ्यास करणा-यांसाठी अशाप्रकारचा हा पहिलाच व्हिडीयो आहे
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १ - सूर्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र टिपणारा व्हिडीयो नासाने प्रसारीत केला असून, अंतराळाचा अभ्यास करणा-यांसाठी अशाप्रकारचा हा पहिलाच व्हिडीयो आहे. सूर्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र काय करामती करतं, हे या व्हिडीयोत दिसत असून यामुळं सूर्याच्या विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासास सहाय्य होणार आहे.
या व्हिडीयोमध्ये एरवी दृष्टीस न पडणा-या चुंबकीय रेषा दिसतात ज्या सूर्यापासून बाहेर पडत आहेत, उत्साहानं फुरफुरणारा नूडल्सचा गोळा असावा असा सूर्य भासतो आणि त्यापासून चुबंकीय शक्ती लाभलेले कण बाहेर झेपावतायत असं दृष्य यात दिसतं.
'सूर्यामध्ये चुंबकीय क्षेत्र नक्की कुठे निर्माण होतं, याबद्दल आम्हाला निश्चित माहिती नाही. ते कदाचित सूर्याच्या पृष्ठभागावर असेल किंवा सूर्याच्या खूपमध्ये आतमध्ये असेल,' असं मेरीलँड येथील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील अवकाश संशोधक डीन पेसनेल यांनी सांगितलं.
सूर्यमालेमधल्या अवकाशाचं ज्ञान व्हावं यासाठी चुंबकीय यंत्रणेची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
पृथ्वीवरच्या सगळ्या प्रकारच्या किरणोत्सारांसाठी सूर्याचे चुंबकीय क्षेत्र जबाबदार असल्यामुळे या क्षेत्राचं ज्ञान संशोधकांसाठी महत्त्वाचं आहे.