रातोरात करोडपती झाला मजूर मच्छीमार; हाती लागला २५ कोटींचा समुद्री "दगड"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 12:36 PM2020-12-01T12:36:27+5:302020-12-01T12:38:33+5:30
Whale Vomit, Ambergris : व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अॅम्बरग्रीस असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या गोळ्य़ाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो.
बँकॉक : उलटीसारखी किळसवाणी गोष्ट कोणालाही पाहण्याची इच्छा नसते. मात्र, याच उलटीमुळे थायलंडचा मच्छीमार मात्र रातोरात करोडपती बनला आहे. त्याच्या जाळ्यात व्हेल माशाची उलटी (Whale Vomit, Ambergris) सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो या उलटीच्या गोळ्याला दगड समजत होता.
या मच्छीमार मजुराला दिवस रात्र काबाडकष्ट केल्यावर महिन्याला ५०० पाऊंड मिळत होते. त्याला आता २४ लाख पाऊंड मिळणार आहेत. Ambergris ला समुद्राचा खजिना मानले जाते. याची किंमती सोन्याहूनही जास्त असते. यामध्ये गंध नसलेले अल्कोहोल असते, ज्याचा वापर परफ्यूमचा वास खूप काळासाठी दरवळत ठेवण्यासाठी केला जातो. थायलंडच्या नारिस सुवानसांगच्या समुद्रात या मच्छीमाराला हा तुकडा मिळाला आहे. तो हा दगड घरी घेऊन गेला. माहिती काढली तेव्हा जे समजले ते ऐकून शॉकच झाला.
व्हेल माशाची ही उलटी एवढी महाग का?
व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अॅम्बरग्रीस असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या गोळ्य़ाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो.
आता या गोळ्याला इतकी किंमत का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणजे, सुगंध. या दगडासारख्या गोळ््याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. मात्र आजही ही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करत आहेत. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे अॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. काही शास्त्रज्ञांच्या मते स्क्वीड (एक प्रकारचा समुद्री जीव) खाल्ल्यावर त्याची चोच व्हेल माशाला टोचू लागते. त्यामुळे व्हेल मासा त्याच्याभोवती या द्रव्याचे संचयन करतो.
काही अॅम्बरग्रीसमध्ये अशा टोकदार वस्तू सापडल्या आहेत. हे सुगंधी द्रव्य बाळगणे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानले जाते. स्पर्म व्हेलची संख्या कमी होत चालल्यामुळे ते बाळगणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. बहुतांशवेळा अॅम्बरग्रीसला कुत्रे शोधून काढतात त्यामुळे काही कुत्र्यांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून शोध घेतला जातो. दक्षिण अफ्रिका, ब्राझील, मादागास्कर, मालदीव, भारत, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत. हा पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा काळ, त्याचा सुवास, तो दुर्मिळ असणे आणि शोधायला मुश्कील असणे या कारणांमुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि किंमत मिळालेली आहे. जगभरात त्याचे लिलाव करुन लाखो डॉलर्सची किंमत वसूल केली जाते. गेली अनेक वर्षे हा पदार्थ स्पर्म व्हेलच्या तोंडाद्वारे बाहेर फेकला जाणारा पदार्थ असावा असा अंदाज होता मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा गोळा त्याच्या गुदद्वारावाटे बाहेर फेकला जात असावा.
इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे.