आशियातील 'हे' पाच देश सर्वाधिक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 05:04 PM2018-04-25T17:04:02+5:302018-04-25T17:04:02+5:30
प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर
न्यू यॉर्क- आशिया खंडातील पाच देशांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. इंडोनेशियातील सित्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे. जगातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती ओळखली जात आहे. या नदीवर प्लास्टिकचा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.
आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या पाच देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे असे ओशन कॉन्झर्वन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आणि त्यातील केवळ 9.5 टक्के प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे केवळ सागरी जीवच मरतात असे नाही असे नाही तर त्यातून बाहेर पडणारी विषद्रव्ये मासे खाणाऱ्या लोकांच्याही पोटात जातात. इतक्या प्रदुषणाने सागरी जीवन धोक्यात आले असले तरी प्लास्टिकचा वापर कमी केल्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.