मून-किम भेट; शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या जगभरातील एेतिहासिक भेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 06:43 PM2018-04-27T18:43:07+5:302018-04-27T22:08:22+5:30

द. कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची ऐतिहासिक बहुचर्चित बैठक अखेर संपली आहे. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपकल्पावर शांतता नांदावी यासाठी अण्वस्त्रमुक्त कोरियासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे.

Five historic summits for peace | मून-किम भेट; शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या जगभरातील एेतिहासिक भेटी

मून-किम भेट; शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या जगभरातील एेतिहासिक भेटी

googlenewsNext

सेऊल- द. कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची ऐतिहासिक बहुचर्चित बैठक अखेर संपली आहे. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपकल्पावर शांतता नांदावी यासाठी अण्वस्त्रमुक्त कोरियासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. या भेटीप्रमाणेच जगातील काही इतर भेटी व करारही त्या त्या काळाच्या टप्प्यावर महत्त्वाचे होते. त्यातील काही भेटी व करार पुढीलप्रमाणे-

1945 याल्टा कॉन्फरन्स - या परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि रशियाचे अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांनी सहभाग घेतला होता. जर्मनीने बिनशर्त शरणागती मागायची आणि महायुद्धानंतर जर्मनीच्या व्यवस्थेबाबत काय योजना करायची याबाबत निर्णय या परिषदेत घेण्यात आला.  जर्मनीने युद्धखर्च द्यावा यावर रुझवेल्ट, चर्चिल आणि स्टॅलिन यांचे एकमतही झाले.

1973 पॅरिस पीस अॅकॉर्ड- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हीएतनाममधून अमेरिकन फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्हीएतनामशी चर्चा सुरु करण्यात आली. पॅरिसमध्ये हेन्री किसिंजर आणि उत्तर व्हीएतनामचे पॉलीटब्यूरो सदस्य ले ड्युक थो यांची 1969 साली भेट झाली. ही बोलणी पुढील तीन वर्षे चालली. त्यानंतर निक्सन यांनी दक्षिण व्हीएतनामचे अध्यक्ष थिएयू यांच्यावर शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी चर्चा केली व अखेर 1973मध्ये त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही उत्तर व दक्षिण व्हीएतनाम यात सहभागी होते. मात्र दोन्ही व्हीएतनामनी त्याचे पालन केले नाही. दोन्ही देशांमध्ये 1975पर्यंत हिंसा सुरुच होती. अखेर उत्तर व्हीएतनामने सायगांव घेतल्यानंतर युद्धाची समाप्ती झाली.

1978 कॅम्प डेव्हीड अॅकार्ड- इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाखेम बेगिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्याबरोबर प्रेसिडेंशियल रिट्रिट कॅम्प डेव्हीड (मेरिलँड) येथे शांतता चर्चा झाली. इस्रायलने सायनाई द्वीपकल्प इजिप्तला परत करण्याचे मान्य केले तर इजिप्तने सुएझ कालवा इस्रायली जहाजांसाठी खुला केला. त्यानंतर सादत व बेगिन यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले.

 1993 ओस्लो अॅकॉर्ड - इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील शांततेसाठी क्लिंटन सरकारने नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे गुप्त चर्चा करुन प्रयत्न केले होते.  या गुप्त चर्चेचे फलीत म्हणजेच ओस्लो अॅकॉर्ड होय. बिल क्लिंटन, इस्रायलचे पंतप्रधान यिटझॅक राबिन आणि पीएलओचे अध्यक्ष यासर अराफात यांचा हस्तांदोलन करतानाचा ऐतिहासिक फोटो प्रसिद्ध आहे. या करारामुळे पॅलेस्टाइनमध्ये सरकार स्थापन होण्यासाठी आणि गाझामधून इस्रायली फौजा मागे घेण्यात आल्या.

1998 द गुड फ्रायडे अॅग्रीमेंट- नॉर्दन आयर्लंडचा प्रश्न सोडविण्यासाठी बिल क्लिंटन यांनी जॉर्ज मिटशेल यांना पाठवले. त्यांच्याबरोबर इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि  आयरिश नेते सिन फेइन आणि बेर्टी अहर्न यांनी नॉर्दन आयर्लंड हा युनायटेड किंग्डमचाच भाग असल्याचे जाहीर केले मात्र नागरिकांना त्यांना कोणाबरोबर राहायचे आहे याबाबत निर्णय घेण्यासाठी सार्वमताचा अधिकार दिला.


 

Web Title: Five historic summits for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.