अमेरिकेत स्वकष्टाने श्रीमंत झालेल्या महिलांमध्ये पाच भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:14 AM2021-08-13T06:14:52+5:302021-08-13T06:15:03+5:30
फोर्ब्सच्या यादीत मराठमोळ्या नेहा नारखेडेंचाही समावेश; इंद्रा नुयी ९१ व्या स्थानावर
नवी दिल्ली : प्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जारी केलेल्या ‘अमेरिकेच्या स्वकष्टार्जित श्रीमंत महिला’ या यादीत भारतीय वंशाच्या ५ महिलांनी स्थान मिळविले आहे. क्लाऊड क्षेत्रातील कंपनी कॉन्फ्युएन्टच्या सहसंस्थापिका व माजी तंत्रज्ञान अधिकारी नेहा नारखेडे, पेप्सिकोच्या माजी चेअरमन व सीईओ इंद्रा नुयी, सिंटेलच्या सहसंस्थापिका नीरजा सेठी, अरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्ष व सीईओ जयश्री उलाल आणि गिंगको बायोवर्क्सच्या सहसंस्थापिका रेशमा शेट्टी यांचा त्यात समावेश आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार, इंद्रा नुयी यांची संपत्ती २९० दशलक्ष डॉलर आहे. त्यांचा यादीत ९१ वा क्रमांक लागला. जयश्री उलाल यांची संपत्ती १.७ अब्ज डॉलर असून त्यांचा १६ वा क्रमांक आहे. नीरजा सेठी यांची संपत्ती १ अब्ज डॉलर असून यादीत त्यांचा क्रमांक २६ वा आहे. नेहा नारखेडे यांची संपत्ती ९२५ दशलक्ष डॉलर असून फोर्ब्सच्या यादीतील त्यांचा क्रमांक २९ वा आहे. रेश्मा शेट्टी यांची संपत्ती ७५० दशलक्ष डॉलर असून फोर्ब्सच्या यादीत त्यांनी ३९ वे स्थान पटकावले आहे.