सौदीत पाच जणांना ३२ वर्षांचा कारावास
By admin | Published: May 11, 2014 11:43 PM2014-05-11T23:43:05+5:302014-05-11T23:43:05+5:30
‘व्हॅलेन्टाईन डे’निमित्त पार्टी आयोजित करून मद्यपान आणि महिलांसोबत नृत्य केल्याने सौदी अरेबियातील पाच जणांना ३२ वर्षांच्या कारावासासह ४,५00 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Next
>रियाध : ‘व्हॅलेन्टाईन डे’निमित्त पार्टी आयोजित करून मद्यपान आणि महिलांसोबत नृत्य केल्याने सौदी अरेबियातील पाच जणांना ३२ वर्षांच्या कारावासासह ४,५00 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हेगारी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.
हे सर्व जण बुराईदाह प्रांताच्या अल-फारूक भागातील एका रेस्ट हाऊसवर पार्टी करीत होते. कमिशन फॉर द व्हच्यरू अँड प्रिव्हेन्शन ऑफ व्हाईसच्या (सीपीव्हीपीव्ही) पोलिसांनी सुरक्षा गस्ती पथकाच्या मदतीने १४ फेब्रुवारी रोजी त्यांना पकडले होते. या पाच जणांसोबत सहा महिला होत्या. या सर्वांनी मद्यपान व महिलांसोबत नृत्य केल्याची कबुली दिली होती. पाच जणांच्या शिक्षेनंतर आता सहा महिलांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
धार्मिक पोलीस
सीपीव्हीपीव्ही ही शरिया कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेली सरकारी संघटना आहे. या संघटनेला धार्मिक पोलीस असेही संबोधले जाते.
सीपीव्हीपीव्हीमधील कर्मचारी आणि अधिकार्यांची नियुक्ती थेट सौदीचे राजे करतात. या आयोगाला प्रचंड अधिकार दिलेले असून आर्थिक तरतूदही भरभक्कम असते. सीपीव्हीपीव्हीसाठी २0१३ मध्ये केलेली तरतूद जवळपास ३९0 दशलक्ष डॉलर एवढी होती. (वृत्तसंस्था)