पाच मिनिटे वेगवान हालचालींमुळे हृदयविकाराचा धोका कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:48 IST2024-12-23T10:48:28+5:302024-12-23T10:48:36+5:30
सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन

पाच मिनिटे वेगवान हालचालींमुळे हृदयविकाराचा धोका कमी
सिडनी: चार ते पाच मिनिटांच्या व वेगवान हालचाली असलेल्या व्यायामामुळे हृदय तसेच रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. याचा फायदा विशेषतः महिलांना अधिक प्रमाणात होतो, असे दिसून आले आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. साधारणतः दीड ते पाच मिनिटांपर्यंतचा वेगवान हालचालींचा व्यायाम केला, तर हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका कमी होतो, असे सिडनी विद्यापीठातील चार्ल्स पर्किन सेंटरमधील मॅकेन्झी वेअरेबल्स रिसर्च हबचे संचालक व औषधे, आरोग्य या विषयांचे प्राध्यापक इमॅन्यूएल स्टामाटाकिस यांनी सांगितले. शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत व्यायामाचे महिला, पुरुष यांच्यावर कोणते परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात आला.
बहुतांश नियमितपणे व्यायाम करत नाहीत
ब्रिटनच्या बायोबॅकमधील मध्यमवयीन १ लाख ३ हजार लोकांच्या आरोग्याबाबतचा तपशील शास्त्रज्ञांनी तपासला. या लोकांचे सरासरी वय ६१ वर्षे आहे. २२ हजार लोकांनी सांगितले की, ते ठराविक पद्धतीचा व्यायाम करत नाही. मात्र, आठवड्यातून एकदा खूप चालण्याचा व्यायाम करतात. जे दिवसभरात वेगवान शारीरिक हालचाली करतात, त्यांना आरोग्याच्या दृष्टीने त्याचे लाभ मिळतात. त्यामुळे शरीराचे चलनवलन अधिक प्रमाणात होणे आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
विकार का वाढतात?
इमॅन्यूएल स्टामाटाकिस म्हणाले की, पुरेशा शारीरिक हालचाली नसल्याने विकारग्रस्त होऊन दरवर्षी ६० लाख लोक मरण पावतात.
त्यातील १५ ते २० टक्के लोकांना हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार जडलेले असतात. जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, धावणे आदी गोष्टींमुळे शरीराच्या वेगवान हालचाली होतात. पण, मध्यमवयीन व त्यापेक्षा अधिक वय असलेले फक्त २० टक्के लोक अशा प्रकारचा व्यायाम करतात.
सिडनी विद्यापीठाने केलेल्या या पाहणीतील निष्कर्षावर आधारित लेख ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसिन या नियकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
'सकाळी पौष्टिक नास्ता करा, सुदृढ राहा'
दररोज सकाळी प्रोटीन, तंतुमय पदार्थ व अन्य पोषक तत्वांनी युक्त असा नाष्टा घेतल्यास त्यामुळे हृदय, रक्तवाहिन्या यांच्या विकारांचा धोका कमी करता येतो असा निष्कर्ष नव्या पाहणीतून काढण्यात आला आहे.
त्या संशोधनाबाबतचा एक लेख जर्नल ऑफ न्यूट्रिशियन, हेल्थ, एजिंग या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
पुरेशा कॅलरी असलेला नाष्टा जर एखाद्या व्यक्तीने केला तर त्याच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये घट होईल असे स्पेनमधील डेल मार रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक आयव्हरो हर्निएझ यांनी सांगितले.