पाच हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिममानवाच्या खुनाचा छडा!

By admin | Published: March 29, 2017 01:42 AM2017-03-29T01:42:54+5:302017-03-29T01:42:54+5:30

इटलीच्या उत्तरेस आॅस्ट्रियाला लागून असलेल्या ओत्झाल प्रांतातील आल्प्स पर्वतात पाच हजार वर्षांपूर्वीच्या ज्या हिममानवाचे

Five-thousand-year-old Himalayan killer murder! | पाच हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिममानवाच्या खुनाचा छडा!

पाच हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिममानवाच्या खुनाचा छडा!

Next

बोल्झानो (इटली) : इटलीच्या उत्तरेस आॅस्ट्रियाला लागून असलेल्या ओत्झाल प्रांतातील आल्प्स पर्वतात पाच हजार वर्षांपूर्वीच्या ज्या हिममानवाचे प्रेत सापडले होते त्याचा कदाचित खाद्यपदार्थ गोळा करण्यावरून झालेल्या मारामारीत प्रतिस्पर्ध्याने पाठीमागून बाण मारून खून केला होता, असा निष्कर्ष अत्याधुनिक फॉरेन्सिक तंत्रांचा वापर करून तपासकर्त्यांनी काढला आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ३,३०० च्या आसपास ताम्रयुगात होऊन गेलेल्या या पुरुष हिममानवाचे प्रेत सन १९९१ मध्ये आल्प्स पर्वतांत गिर्यारोहण करणाऱ्या हायकर्सना सापडले होते. इतकी वर्षे एका गोठलेल्या हिमनदीत न सडता जसेच्या तसे टिकून राहिलेले हे प्रेत जागतिक तापमानवाढीने बर्फ वितळल्यामुळे दृष्टोत्पत्तीस पडले होते. ओत्झाल प्रांतात सापडले म्हणून या हिममानवास ‘ओत्झी’ असे टोपणनाव दिले गेले.
तेव्हापासून हे प्रेत गेली २५ वर्षे बोल्झानो येथील दक्षिण टायरॉल पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयात ‘मम्मी’च्या स्वरूपात अक्षरश: गोठवून जतन करून ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वोत्तम जतन करून ठेवलेली ‘मम्मी’ म्हणून ती ओळखली जाते. (वृत्तसंस्था)

पोटातील अन्नांशांचे विश्लेषण

गोठलेल्या हिमनदीत या हिममानवाचे प्रेत एवढे अप्रतिम जतन झाले  की त्याच्या शरीरातील अंतर्गत अवयवही पाच हजार वर्षे जसेच्या तसे  शाबूत राहिले. यामुळेच त्याच्या पोटातील अन्नाशांचे रासायनिक विश्लेषण शक्य झाले. त्यावरून त्याच्या मृत्यू झाला, तो हिवाळ््याचा अखेरचा किंवा उन्हाळ््याचा सुरुवातीचा काळ होता आणि शेवटच्या जेवणानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला होता, असे वाटते.

10 वर्षांपूर्वी या ‘मम्मी’ची क्ष-किरण तपासणी केली गेली, तेव्हा या प्रेताच्या पाठीत गारगोटीचे टोक लावलेल्या बाणाने झालेली जखम आढळून आली होती. त्यावरून या हिममानवाचा अपमृत्यू झाला असावा, असा कयास केला गेला. पण मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.

हत्या नेमकी झाली कशी?
वस्तु संग्रहालयाच्या संचालिका अँगेलिका फ्लेकिंगर यांना चैन पडेना. त्यांनी अनेक गूढ खुनांचा छडा लावण्याचा दांडगा अनुभव असलेले जर्मनीतील म्युनिक पोलीस दलाचे निरीक्षक अ‍ॅलेक्झांंडर हॉर्न यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
हॉर्न यांनी फॉरेन्सिक विज्ञानाच्या अनेक अतिप्रगत उपशाखांचा उपयोग करून या हिममानवाचा खून झाला होता, असा निष्कर्ष काढला. एवढेच नव्हे तर त्या दिवशी नेमके काय घडलेले असू शकते, याचा एक संभाव्य स्थितीआलेखही त्यांनी तयार केला आहे.
हॉर्न यांनी केलेल्या तपासात त्यांना या हिममानवाच्या पाठीवर आधी आढळलेल्या
बाण घुसल्याच्या जखमेखेरीज उजव्या हातावर अंगठा आणि तर्जनी यांच्या मध्ये एक खोल, हाडापर्यंत गेलेली खोल जखमही दिसली. ही जखम मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी झाली असावी, असा त्यांनी अंदाज बांधला.

...आणि बाण थेट छातीत घुसला
सर्व दुव्यांचा संगतवार अर्थ लावून हॉर्न यांनी जो आडाखा बांधला, तो थोडक्यात असा : त्या दिवशी हा हिममानव डोंगरावरून सुमारे ६,५०० फूट खाली उतरून दरीत आला.
तेथे त्याने खाद्यपदार्थ गोळा केले. ते करीत असताना त्याची प्रतिस्पर्ध्याशी हाणामारी झाली. त्यात जो विजयी ठरला. अन्न घेऊन तो पुन्हा १०,५५० फूट डोंगर चढून त्याच्या आश्रयाच्या ठिकाणी आला. तेथे त्याने विस्तव पेटवून आणलेले अन्न भाजले व त्याचे सेवन केले.
तो निवांतपणे आराम करत बसलेला असताना कोणीतरी (कदाचित आदल्या दिवशी ज्याच्याशी हाणामारी झाली तो) पाठीमागून येऊन त्याच्यावर १०० फूट अंतरावरून बाण मारला. तो बाण त्याच्या काखेखालच्या बरगडीतून छातीत घुसला व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Five-thousand-year-old Himalayan killer murder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.