अमेरिकेत वादळाचा फटका; हजारो उड्डाणे रद्द, वीजपुरवठा खंडित, शाळाही बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:17 PM2023-08-08T15:17:05+5:302023-08-08T15:17:28+5:30
या बिकट परिस्थितीत रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वॉशिंग्टन : अमेरिकेत (America)सध्या मोठे वादळ आले आहे. त्यामुळे हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच, राजधानी वॉशिंग्टनमध्ये शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने सोमवारी अमेरिकेत चक्रीवादळांसह विनाशकारी वादळाचा इशारा दिला होता.
काल संध्याकाळी ५ वाजल्यानंतर वॉशिंग्टन परिसरात पाऊस सुरू झाला आणि आकाश हळूहळू धूसर झाले. या बिकट परिस्थितीत रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. हवामान विभागाने रात्री ९ वाजेपर्यंत ग्रेटर डीसी क्षेत्रासाठी चक्रीवादळाचा इशारा दिला होता. मंगळवारी सकाळपर्यंत पुराचा इशाराही देण्यात आला होता. तसेच, हवामान विभागाने सांगितले की, वादळाचा परिणाम दूरवरच्या भागात होऊ शकतो.
टेनेसी ते न्यूयॉर्कपर्यंत १० राज्यांमध्ये चक्रीवादळ पसरण्याचा इशारा दिला. सोमवारी दुपारपर्यंत १३०० हून अधिक अमेरिकेतील विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि ५५०० हून विमानांना लँडिंगसाठी उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारच्या वादळामुळे बंद पडलेल्या हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्यात आली. व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा चार दिवसांचा दौराही थांबवला आहे. त्यांचे इतर कार्यक्रम आणि कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
१५००० लोक अंधारात
जवळजवळ १५००० लोक व्हर्जिनियाच्या लाउडाउन काउंटीमध्ये वीज नसल्यामुळे अंधारात राहत आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसचे हवामानशास्त्रज्ञ क्रिस स्ट्रॉन्ग यांनी फेसबुक लाईव्ह ब्रीफिंगमध्ये सांगितले की, "मध्य-अटलांटिक मधील ही सर्वात प्रभावी गंभीर हवामान घटनांपैकी एक आहे, जी आम्ही काही काळामध्ये पाहिली आहे." दरम्यान, दुपारनंतर वादळ येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.