३०० भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्समध्ये अचानक रोखले, सर्वांची कसून चौकशी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:10 AM2023-12-23T09:10:42+5:302023-12-23T09:11:21+5:30
Flight Detained In France: सुमारे ३०० भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले विमान फ्रान्समध्ये अचानक रोखण्यात आले. त्यामुळे विमानात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. संयुक्त अरब अमिरातीमधून निकारगुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये अडवण्यात आले.
सुमारे ३०० भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले विमानफ्रान्समध्ये अचानक रोखण्यात आले. त्यामुळे विमानात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. संयुक्त अरब अमिरातीमधून निकारगुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये अडवण्यात आले. तसेच या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. फ्रेंच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमधून ३०३ भारतीय प्रवाशांना घेऊन निकारगुआ येथे जात असलेल्या एका विमानाला मानवी तस्करीच्या संशयामुळे फ्रान्समध्ये उतरवण्यात आले.
फ्रेंच वृत्तपत्र ली मोंडे ने दिलेल्या वृत्तानुसार देशविरोधी संघटित गुन्हेगारीविरोधी विभाग जेयूएनएएलसीओने तपास आपल्या हाती घेतला आहे. पॅरिस अभियोजक कार्यालयाने सांगितले की, विशेष तपास पथक विमानातील सर्व प्रवाशांची चौकशी करत आहे. तसेच दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोमानियाई कंपनी ‘लिजेंड्स एअरलाइन्स’चं ए३४० विमान शुक्रवारी उतरल्यानंतर वेट्री विमानतळावर उभं आहे. पॅरिसपासून १५० किमी पूर्वेला असलेल्या वेट्री विमानतळावर पूर्वेला असलेल्या वेट्री विमानतळावरून बहुतांश व्यापारी विमानांची ये जा होते.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानामध्ये इंधन भरण्यात येणार होते. तसेच त्यामधून प्रवास करत असलेले भारतीय नागरिक हे कदाचित संयुक्त अरब अमिरातीमध्ये काम करतात. फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर प्रवाशांना आधी विमानातच बसवून ठेवण्यात आले. मात्र नंतर त्यांना बाहेर काढून टर्मिनल भवनमध्ये पाठवण्यात आले. संपूर्ण विमानतळाला पोलिसांनी घेरले आहे. विमानातून प्रवास करत असलेले प्रवासी हे मानवी तस्करीची शिकार होऊ शकतात, अशी माहिती मिळाली होती. शेवटी प्रवाशांना विमानतळाच्या मुख्य हॉलमध्ये स्थानांतरीत करण्यात आले. तसेच तिथे त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, लिजेंड एअरलाइन्सने या घटनेबाबत आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका गोपनीय सूचनेच्या आधारावार फ्रान्सच्या तपास यंत्रणांनी ही कारवाई केली आहे. याबाबत फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सांगितले की, फ्रान्स सरकारच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत माहिती दिली आहे. दुबईवरून निकारगुआ येथे जात असलेल्या एका विमानाला तांत्रिक अडचणींमुळे फ्रान्सच्या विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. या विमानामध्ये ३०३ प्रवासी आहेत. त्यातील बहुतांश हे भारतातील आहेत. विमानतळावर दूतावासातील टीम दाखल झाली आहे. तसेच काऊंसलर अॅक्सेसही मिळाला आहे. आम्ही परिस्थितीची माहिती घेत आहोत, असे दूतावासाकडून सांगण्यात आले.