विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’ ओरडणा-या प्रवाशाची जेलमध्ये रवानगी
By admin | Published: July 5, 2016 10:03 AM2016-07-05T10:03:32+5:302016-07-05T10:03:32+5:30
ब्रिटनला जाणा-या विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’चा नारा देत तसंच ‘बूम’ ‘बूम’ ओरडून प्रवाशांना घाबरवल्याबद्द्ल पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाला दहा आठवड्यांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 05 - ब्रिटनला जाणा-या विमानात ‘अल्लाह-हु-अकबर’चा नारा देत तसंच ‘बूम’ ‘बूम’ ओरडून प्रवाशांना घाबरवल्याबद्द्ल पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाला दहा आठवड्यांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दुबईहून बर्मिंघमला जाणा-या इमिरेट्सच्या बोईंग 777 विमानात प्रवास करताना शहराज सरवर या व्यक्तीने अचानक ओरडण्यास सुरुवात केली. शहराज सरवरच्या अशा वागण्याने विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. काही प्रवाशांना तर रडूदेखील आलं होतं.
'विमानात प्रवासादरम्यान प्रचंड गोंधळ होता. काही प्रवासी तर खुप घाबरले होते. आरोपीने जोर जोरात ‘अल्लाह-हु-अकबर’ ओरडण्यास सुरुवात केली. ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला. जेव्हा विमान खाली उतरलं तेव्हादेखील 'बूम' असं तो जोरात ओरडला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं, त्यांनी शहराज सरवरला अटक केली', अशी माहिती सरकारी वकिल अॅलेक्स वॉरेन यांनी बर्मिंघम न्यायालयात दिली आहे.
न्यायाधीशांनी विमानात अशा प्रकारे प्रवाशांना घाबरवण्याच्या आणि रडवण्याच्या घटनेला गंभीरतेने घेतल आहे. शहराज सरवरला दहा आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून न्यायालयाकडे दुसरा पर्याय नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
शहराज सरवरच्या वकिलांनी बचाव करत त्याने जे केलं तो मुर्खपणा होता, पण तो पाकिस्तानमधील आपल्या आजीचा अंत्यसंस्कार करुन परतत होता. तो दुखी: होता असं न्यायालयात सांगितलं आहे. न्यायाधीशांनी मात्र शहराज सरवरची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर पुढील 12 महिने देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.