शॉपिंगसाठी सुपरमार्केटमध्ये गेलेल्या व्यक्तीचं फळफळलं नशीब; मिळाले 13 हजार 311 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:18 PM2023-09-29T17:18:37+5:302023-09-29T17:38:57+5:30
फ्लोरिडामधील एका व्यक्तीने मेगा मिलियन्स लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे आणि तो आता $1.6 बिलियन डॉलर्स (13 हजार 311 कोटी) किंमतीच्या पैशावर आपला दावा करण्यासाठी पुढे आला आहे.
कोणाचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीस घडलं ज्याची लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. फ्लोरिडामधील एका व्यक्तीने मेगा मिलियन्स लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे आणि तो आता $1.6 बिलियन डॉलर्स (13 हजार 311 कोटी) किंमतीच्या पैशावर आपला दावा करण्यासाठी पुढे आला आहे.
आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, मोठं बक्षीस जिंकलेल्या या व्यक्तीने फ्लोरिडा येथील जॅक्सनविले येथील पब्लिक्स सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना नशीब आजमावण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तथापि, त्या व्यक्तीने आपला दावा करण्यास थोडा विलंब केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला विजेत्या तिकीटांचे क्रमांक काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यूएस कायद्यानुसार, लॉटरी किंवा मोठ्या बक्षीस रकमेमध्ये, विजेत्याचे नाव 90 दिवसांपर्यंत गुप्त ठेवणं आवश्यक आहे. फ्लोरिडाचं हे प्रकरण सुद्धा खास आहे कारण अमेरिकेच्या लॉटरीच्या इतिहासात तिसरी वेळ आहे की एखाद्याने एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून जिंकली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये आणखी एका व्यक्तीने 2.04 बिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली होती.
फ्लोरिडा प्रकरणातील विजेत्याने आता ठरवलं पाहिजे की त्यांना ही रक्कम एकरकमी हवी आहे की संपूर्ण रक्कम 30 वार्षिक पेमेंटमध्ये विभागली गेली पाहिजे. ते जे काही निवडतील, त्यांना लॉटरीच्या पैशाचा मोठा भाग कराच्या रूपात सरकारला द्यावा लागेल.
लॉटरी मालकांनी अद्याप कोणता पर्याय निवडला हे उघड केलेलं नाही परंतु मागील प्रकरणांमध्ये पाहिल्याप्रमाणे, लॉटरीतील विजेते फक्त एकरकमी रक्कम घेतात. मेगा मिलियन्स अमेरिकेच्या 45 राज्यांमध्ये खेळला जातो आणि ते जिंकणं एखाद्या स्वप्नासारखं असतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.