उडती छत्री आली होss; जपानच्या संशोधकांचा 'लय भारी' शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:11 PM2018-07-09T19:11:01+5:302018-07-09T19:17:02+5:30
जपानच्या आयटी कंपनीने लावलाय भन्नाट शोध. लवकरच बाजारात येतेय उडणारी छत्री.
टोकियो - आपण एक वाक्य नेहमी ऐकतो, 'नथिंग इज इंपॉसिबल'. म्हणजेच या जगात काहीही अशक्य नाही. जपानमधील एका आयटी कंपनीच्या संशोधनाने हे वाक्य खरे करुन दाखवले आहे. जपानमधील ही आयटी कंपनी एक छत्री बनवत असून ती हवेत उडू शकते. या छत्रीला हातात पकडण्याची गरज नाही. छत्री वापरणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरुन ही छत्री त्या व्यक्तीसोबत आपोआपच पुढे जाईल. तोचिगी प्रीफेक्चरच्या ओयामास्थित पॉवर सर्व्हिस कॉर्पोरेशनद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
छत्री बनविणाऱ्या या कंपनीकडून इतर सेवांसह दूरसंचार प्रणालीही विकसित करण्यात येत आहे. कंपनीकडून इनडोअर टेस्ट फ्लाईटच्या सहाय्याने या छत्रीच्या नमून्याचा प्रयोग यशस्वी करण्यात येणार आहे. टोकियोमध्ये 2020 साली होणाऱ्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक सामन्यांवेळी या छत्रीचा उपयोग करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीचे मालक 40 वर्षीय केनजी सुजुकी यांनी 3 वर्षांपूर्वीच या उडत्या छत्रीच्या संकल्पनेचा प्रस्ताव तयार केला होता. आपले दोन्ही हात कामात व्यस्त असल्यानंतर छत्री उघडताना त्रास होतो. या त्रासाला लक्षात घेऊनच सुजुकी यांनी उडत्या छत्रीच्या संकल्पनेवरील कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. दरम्यान, पावसाळ्यात या छत्रीचा चांगल्याप्रकारे फायदा करुन घेता येऊ शकतो.