युद्धासाठी सज्ज रहा - शी जिनपिंग यांचे चिनी लष्कराला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 03:03 PM2017-10-27T15:03:35+5:302017-10-27T16:20:29+5:30
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली.
बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली. चिनी लष्कराला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हटले जाते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने 19 व्या काँग्रेस परिषदेत केंद्रीय लष्करी आयोगावर नव्या सदस्यांची निवड केली आहे. या सदस्यांबरोबर शी जिनपिंग यांनी चर्चा केली. यावेळी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला युद्ध जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला तसेच युद्धासाठी सज्ज राहण्यासही सांगितले.
युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.
भविष्यात चीन समोर अमेरिकेच्याबरोबरीने भारताचेही आव्हान असेल. दोन महिन्यांपूर्वी डोकलामच्या मुद्यावरुन चीन आणि भारताचे लष्कर समोरासमोर उभे होते. यावेळी चीनकडून दादागिरीचा भरपूर प्रयत्न झाला. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रातून भारताला भरपूर धमक्या देण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारचाने ना युद्धाची भाषा केली, ना आपले सैन्य मागे घेतले. भारताच्या या खंबीर भूमिकेमुळे अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारताबरोबर आपल्याला युद्ध परवडू शकत नाही हे चीनच्या कळून चुकले आहे तसेच दक्षिण चीन समुद्रातही चीनसमोर अनेक देशांचे आव्हान आहे. त्यामुळे चीनने आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर जोर दिला आहे.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मागच्या आठवडयात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेसमध्ये साडेतीन तासांचे भाषण केले. यावेळी त्यांनी सन २०१२ मध्ये पक्ष व सरकारची धुरा स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर करतानाच शी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत चीनला महान समाजवादी राष्ट्र बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.बीजिंगमधील हे अधिवेशन जागतिक प्रसारमाध्यमांना खुले नव्हते. एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनमध्ये पक्ष व सरकारप्रमुख म्हणून एकाच व्यक्तीकडे ठेवण्याची परंपरा आहे.