बाजवासाठी तालिबान बनला भस्मासूर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर कधीही युद्ध पेटण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:38 PM2022-04-19T13:38:14+5:302022-04-19T13:39:08+5:30
Pakistan-Afghanistan News: अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनींच्या जागी पुन्हा एकदा तालिबानला सत्तेत आणण्यासाठी ताकद लावणारे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयसाठी हेच तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर बनले आहेत.
इस्लामाबाद - अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनींच्या जागी पुन्हा एकदा तालिबानला सत्तेत आणण्यासाठी ताकद लावणारे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयसाठी हेच तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर बनले आहेत. तालिबानचे संरक्षण लाभलेले तहरीक ए तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांची सातत्याने हत्या करत आहेत. टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून पाकिस्तानमध्ये पळून जात आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानी हवाईदलाने अफगाणिस्तानमध्ये घुसून हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ५० जण मारले गेले. त्यामुळे तालिबान संतप्त झाला असून सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर नाट्यमय पद्धतीने दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार १४ एप्रिल रोजी अफगाणिस्तानमधील तालिबानी सैन्याने ३५ राऊंड गोळे डागले. तसेच चित्राल भागात पारिस्तानी सीमेवरील चौक्यांवर भीषण गोळीबार केला. हल्ला सुमारे सहा तास सुरू होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने रात्री ३ वाजता आपले फायटर जेट अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार भागात पाठवले. या विमांनांनी टीटीपी आणि हाफिझ गुल बहादर समुहाच्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक केली. या हल्ल्यात महिला आणि मुलींसह ५० सर्वसामान्य नागरिक मारले गेले होते.
दरम्यान, हे दहशतवादी गट हे पाकिस्तानी सरकारला सातत्याने विरोध करत असतात. तसेच पाकिस्तानी लष्करावर हल्ले करत असतात. आता पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हल्ल्यापूर्वी टीटीपीने ७ पाकिस्तानी सैनिकांची हत्या केली होती. तालिबान सरकारने पाकिस्तानमधील टीपीपीच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच २७०० किमी लांब ड्युरंड रेषेवर तारेचे कुंपण घालण्यासही विरोध केला आहे.
यापूर्वीही अफगाण सरकारने ड्युरंड लाईन फेटाळली होती. तसेच यावर्षी जानेवारी महिन्यात तालिबानी सैनिकांनी सीमेवर तार लावण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यावेळी किरकोळ संघर्ष झाला होता. मात्र आता असे संघर्ष वाढत असून, त्यातून सीमेवर युद्ध पेटण्याची शक्यता वाढत आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हल्लीच कुनार, बाजौर, पाकटीका, वजिरीस्तान आणि खोस्तवर हल्ले केले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच आपल्या देशात कुठलाही दहशतवादी गट असल्याचे वृत्त फेटाळले आहे.
पाकिस्तानी हवाई दलाच्या कारवाईमुळे तालिबान संतप्त झाला असून, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. जर पुन्हा अशी घटना घडली तर चोख उत्तर दिलं जाईल, असा इशारा तालिबानने दिला आहे.