नेपाळच्या पंतप्रधानांनंतर परराष्ट्रमंत्री बरळले, रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 08:57 AM2020-07-15T08:57:28+5:302020-07-15T09:25:34+5:30
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.
काठमांडू - हजारो वर्षांपासून भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या नेपाळमध्ये सध्या भारतविरोध कमालीचा तीव्र होताना दिसून येत आहेत. त्यामुळेच भारतापासून राजकीय दृष्ट्या दूर जात असतानाचा नेपाळमधील नेते भारत आणि नेपाळमध्ये असलेले समान सांस्कृतिक नातेही तोडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परवा नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.
पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलेल्या विधानाचा बचाव करताना नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले की, ‘’रामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत.’’
‘’जिथपर्यंत मला माहिती आहे त्यानुसार रामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत. आतापर्यंत केवळ पारंपरिक विश्वासाच्या आधारावर आपण सांगतो की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला होता आणि तिचा विवाह रामासोबत अयोध्येत झाला होता.’’असे ज्ञावली यांनी सांगितले.
‘’आपल्याला हे सांगण्यात आले की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला आणि रामाचा जन्म अयोध्येत झाला. मात्र ज्यावेळी संशोधनातून काही वेळगे पुरावे समोर येतील तेव्हा रामायणाचा इतिहासच बदलणार आहे. सध्यातरी या गोष्टी लोकांच्या भावनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे याबबत फार काही बोलणे योग्य ठरणार नाही,’’असेही त्यांनी सांगितले.
रामायणकाळात चर्चेत राहिलेली ठिकाणे कुठे कुठे आहेत यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचा सांस्कृतिक भूगोलाला अंतिम रूप देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे बुद्धकाळाबाबत आपल्याकडे लिखीत आणि अन्य आधारावर पुष्टी करणारे पुरावे आहेत, त्याप्रमाणे रामायणाचे पुरावे नाहीत, असा दावाही ज्ञावली यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या