इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:50 PM2024-11-04T16:50:47+5:302024-11-04T16:51:03+5:30
इराणचे मंत्री सैयद अब्बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत.
येत्या काही दिवसांत इराण हा देश इस्रायलवर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहे. इराणने आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. अंतर जास्त असल्याने इराकची भूमी देखील वापरली जाण्याची शक्यता आहे. अशातच इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत.
इराणचे मंत्री सैयद अब्बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत. पाकिस्ताननुसार ते व्यापार, उर्जा आणि संरक्षण यावर चर्चा करणार आहेत. पाकिस्तानी मिडीयानुसार इस्रायलच्या हवाई हल्ला आणि तेहरानच्या प्रत्यूत्तर याच काळात ते पाकिस्तानात आल्याने मोठा संदेश दिला जात आहे. इराण या हल्ल्यापूर्वी आपल्या भागातील देशांना एकत्र आणण्याच्या कामी लागला आहे.
इस्रायलसोबत युध्द सुरु झाल्यास पाकिस्तान काही नवीन संकट निर्माण तर करणार नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी इराणने दौरा आखला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामनेई यांनी इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार उत्तर दिले जाईल असे म्हटले होते. पाकिस्तानने इस्रायल हल्ल्यावेळी इराणची बाजू घेत निषेध व्यक्त केला होता. पीएम शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान इराणसोबत उभा असल्याचे वक्तव्य केले होते.
पाकिस्तान आणि इराणची सीमा जवळपास १००० किमीची आहे. इराणवर जर संकट आलेच तर त्याची झळ पाकिस्तानलाही बसणार आहे. इस्रायल जर आक्रमक झाला तर इराण एकटा काही करू शकत नाही असे पाकिस्तानी मिडीयाने म्हटले आहे. यामुळे पाकिस्तान कोणाच्या बाजुने जाणार हे इराणसाठी महत्वाचे आहे. पाकिस्तानकडे अमेरिकेची लढाऊ विमाने आहेत. यामुळे अमेरिका पाकिस्तानचा वापर करू शकते असा संशय इराणला आहे.