अमेरिकेतील परदेशी विद्यार्थी मोठ्या संकटात; थेट देशाबाहेर काढण्यासाठी नवनव्या युक्त्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:55 IST2025-04-08T12:55:24+5:302025-04-08T12:55:40+5:30
अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.अमेरिकेत व्हिसा रद्द केलेल्या काही विद्यार्थ्यांवर पॅलेस्टिनींचे समर्थन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेतील परदेशी विद्यार्थी मोठ्या संकटात; थेट देशाबाहेर काढण्यासाठी नवनव्या युक्त्या
वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे परदेशी विद्यार्थ्यांवरील कारवायांच्या पार्श्वभूमीवर येथील महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी नवनवीन आरोप आणि युक्त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप या महाविद्यालयांनी केला आहे. याच प्रकारे कारवाई होत राहिली तर अमेरिकेतील संस्थांत शिक्षण घेण्यासाठी परदेशातून कुणीच येणार नाहीत. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून होमलँड सिक्युरिटीने त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
क्षुल्लक कारणे अन्...
मिनेसोटा विद्यापीठातील विद्यार्थ्याला ताब्यात घेत त्याच्याकडे आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचे कारण देत व्हिसा रद्द केला गेला. मात्र, प्रत्यक्षात या विद्यार्थ्याला झालेली अटक मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे.
भवितव्य अंधारात
पूर्वी परदेशी विद्यार्थ्यांना अनेकदा अभ्यास पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात सवलती मिळत होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून पूर्वीच्या या सर्व सवलती बंद करून कठोर आदेश दिले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.अमेरिकेत व्हिसा रद्द केलेल्या काही विद्यार्थ्यांवर पॅलेस्टिनींचे समर्थन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर काहींना अगदी क्षुल्लक कारणांमुळे अशा कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
अटक होण्याचाही धोका
गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी एखाद्या आंदोलनात किंवा चळवळीत सहभागी परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे. परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबियो यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. उच्चशिक्षण आणि इमिग्रेशनसंबंधी विभागाचे सीईओ मिरियम फेडब्लम यांनी सांगितले, आता विद्यार्थ्यांच्या व्हिसासह अधिकृत वास्तव्याचा दर्जाच रद्द केला जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना अटक होण्याचाही धोका आहे.