बांगलादेशचे माजी लष्करशहा जनरल ईर्शाद यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:55 AM2019-07-15T04:55:48+5:302019-07-15T04:55:58+5:30
बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा जनरल हुसैन मुहम्मद ईर्शाद यांचे वृद्धापकाळातील गुंतागुंतीच्या आजारांमुळे येथील लष्करी इस्पितळात रविवारी निधन झाले.
ढाका : बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा जनरल हुसैन मुहम्मद ईर्शाद यांचे वृद्धापकाळातील गुंतागुंतीच्या आजारांमुळे येथील लष्करी इस्पितळात रविवारी निधन झाले. जातीय पक्षाचे प्रमुख व संसदेतील विरोधी पक्षनेते असलेले इर्शाद ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रौशन, आता काडीमोड झालेल्या दुसऱ्या विवाहातून झालेला एक किशोरवयीन मुलगा व दत्तक घेतलेली आणखी दोन मुले आहेत.
गेल्या २२ जून रोजी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना लष्करी इस्पितळात दाखल केले गेले होते. हळूहळू एकएक अवयव निकामी होत गेल्याने गेले नऊ दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणेवर ठेवले गेले होते. गेले काही दिवस ते निदान डोळ््यांनी तरी प्रतिसाद देत होते, पण नंतर तेही बंद झाले व रविवारी स. ७.४५ वाजता त्यांचे निधन झाले, असे लष्कराच्या प्रसिद्धी विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी त्यांचे पार्थिव रंगपूर जिल्ह्यातील त्यांंच्या मूळ गावी नेले जाईल. तेथून परत आल्यावर सोमवारी लष्कराच्या बनानी कबरस्तानात दफनविधी करण्यात येईल.
बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद, पंतप्रधान शेख हसिना वाजेद व संसदेच्या सभापती डॉ. शिरीन शर्मिन चौधरी यांनी ईर्शाद यांच्या निधनानिमित्त तीव्र दु:ख व्यक्त केले.
माजी लष्करप्रमुख राहिलेल्या जनरल इर्शाद यांनी १९८२ मध्ये झालेल्या रक्तहिन उठावात देशाची सत्ता काबिज केली. पुढील नऊ वर्षे त्यांनी पोलादी वज्रमुठीने राज्य केले. धर्मनिरपेक्ष देश असूनही इस्लामला बांगलादेशचा अधिकृत धर्म घोषित करण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांच्याच होता. मात्र १९९०मध्ये झालेल्या लोकशाहीवादी उठावानंतर त्यांना पदत्याग करावा लागला. नंतर अनेक आरोपांवरून वेळोवेळी तुरुंगात जाऊनही जनरल इर्शाद जातीय पक्षाच्या माध्यमातून एक प्रभावी राजकीय नेते म्हणून कार्यरत राहिले. (वृत्तसंस्था)
भारताचाही दुखवटा
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जनरल ईर्शाद यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले की, भारताशी व्दिपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यातील योगदान व बांगलादेशसाठी केलेल्या सेवेसाठी ते दीर्घकाळ स्मरणात राहतील.