बांगलादेशच्या माजी पंतप्रधान फरार घोषित
By admin | Published: March 5, 2015 01:06 AM2015-03-05T01:06:08+5:302015-03-05T01:06:08+5:30
बांगलादेशातील एका न्यायालयाने विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट कायम ठेवताना सुनावणीस पुन्हा गैरहजर राहिल्याने गुरुवारी त्यांना फरार घोषित केले.
ढाका : बांगलादेशातील एका न्यायालयाने विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट कायम ठेवताना सुनावणीस पुन्हा गैरहजर राहिल्याने गुरुवारी त्यांना फरार घोषित केले.
झिया यांच्याविरुद्ध साडेसहा लाख डॉलरचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरून दोन खटले दाखल आहेत. झिया अनाथालय ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित या प्रकरणात सुनावणीस उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. झिया यांच्या वकिलांनी त्यांच्या अनुपस्थितीत गुरुवारी न्यायालयात अर्ज सादर करून त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यावर तिसरे महानगर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबू अहमद जमदार म्हणाले ‘खारिज.’ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुखांविरुद्धचे २५ फेब्रुवारीचे अटक वॉरंट कायम राहील, असे ठणकावून न्यायमूर्तींनी सातत्याने सुनावणीला गैरहजर राहत असल्यामुळे झिया यांना फरार घोषित केले. कायद्यानुसार फरार आरोपीच्या वतीने कोणीही याचिका दाखल करू शकत नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले. या प्रकरणीची पुढील सुनावणी ५ एप्रिलला ठेवण्यात आली आहे.