अभिमानास्पद! इस्रोच्या माजी संचालकांना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:09 PM2019-05-03T12:09:57+5:302019-05-03T12:11:22+5:30
अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा फ्रान्सकडून गौरव
नवी दिल्ली: इस्रोचे माजी संचालक ए. एस. किरण कुमार यांचा फ्रान्सनं सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान केला आहे. 'शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर' नावानं हा सन्मान ओळखला जातो. भारत आणि फ्रान्समधील अंतराळ सहकार्य वाढवण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल कुमार यांचा गौरव करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीनं फ्रान्सचे भारतातले राजदूत ऍलेक्झांडर जिगलर यांनी कुमार यांना सन्मानित केलं.
दोन देशांमधील अंतराळ तंत्रज्ञानाला नवा आयाम दिल्याबद्दल कुमार यांचा सन्मान केल्याचं फ्रान्सची अंतराळ संशोधन संस्था सीएनईएसचे संचालक जीन येव्स ले गाल यांनी सांगितलं. भारत आणि फ्रान्सनं अंतराळ संशोधनातलं सहकार्य वाढवण्यासाठी कुमार यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचे कौतुकाद्गार त्यांनी काढले. 'किरण कुमार यांनी केलेली कामगिरी सोपी नव्हती. 2015 ते 2018 या काळात इस्रोचं संचालक म्हणून काम करताना त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली. भारत आणि फ्रान्स यांच्यातलं अंतराळ सहकार्य एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,' अशा शब्दांत ले गाल यांनी फ्रान्सच्या वतीनं कुमार यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
'शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर' पुरस्काराला खूप मोठा इतिहास आहे. 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. फ्रान्सशिवाय इतर देशांच्या नागरिकांनादेखील या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.